…अन्यथा झी टॉकिजचे कार्यालय फोडू

...अन्यथा झी टॉकिजचे कार्यालय फोडू
  • हर हर महादेव चित्रपट दाखविण्यावरून संभाजी ब्रिगेडचा इशारा

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी (दि. ४ डिसेंबर २०२२) : झी टॉकिजवर हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाविरोधात देशात, राज्यात शिवप्रेमींनी तीव्र आंदोलन करत नापसंती व्यक्‍त केली आहे. तरीही झी टॉकिज या चॅनेलने हा चित्रपट दाखविल्यास त्यांच्या मुख्य कार्यालयावर आंदोलन छेडू. तरीही न ऐकल्यास कार्यालय फोडू, असा तीव्र इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांना दिलेल्या निवेदनात हा इशारा दिला आहे.

सतिश काळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, हर हर महादेव चित्रपटामध्ये अनेक चुकीचे व वादग्रस्त संदर्भ दाखवित आले आहेत. यावरून राज्यासह देशभरातील शिवप्रेमींमध्ये चित्रपटाविषयी रोष निर्माण झाला आहे. संभाजी ब्रिगेडने या चित्रपटाचे शो दाखवू नयेत, यासाठी टोकाचा विरोध केला आहे. संबंधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही न ऐकणाऱ्या राज्यभरातील चित्रपट गृहातील शो बंद पाडले आहे. त्यानंतर राज्यातील चित्रपट गृहात शो न दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला.

नुकतेच झी टॉकिज या वाहिनीने हर हर महादेव या चित्रपटाचा शो 18 डिसेंबर रोजी दाखविणार असल्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींच्या भावना पुन्हा दुखावू शकतात. राज्यात कायदा व सुवस्थेचा प्रश्‍न उद्वभवू शकतो. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालून या चित्रपटाचा शो दाखवू नये, अशी सूचना पोलिस यंत्रणांमार्फत जाणे गरजेचे आहे. जर हा चित्रपट दाखविण्याचा निर्णय घेतलाच तर संभाजी ब्रिगेड झी टॉकिजच्या कार्यालयावर जाऊन तीव्र आंदोलन छेडेल. या वेळी महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला संबंधीत चॅनेलचे व्यवस्थापन जबाबदार असेल असा इशाराही संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतिश काळे यांनी दिला आहे.

Actions

Selected media actions