
हडपसर (प्रतिनिधी) - एस. एम. जोशी महाविद्यालयामध्ये मराठी विभाग, मास कम्युनिकेशन ॲंड जर्नालिझम विभाग (Mass Communication and Journalism) व वैश्विक कला पर्यावरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मराठी भाषा गौरव दिन' समारंभानिमित्त विद्यार्थी कवी संमेलन, गीतगायन, भित्तिपत्रक उद्घाटन व ग्रंथ प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.बालाजी सूर्यवंशी (सुप्रसिध्द कवी, छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर) यांनी विविध गीतकवितांचे सादरीकरण करुन, मराठी भाषेचा गौरव करीत, मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास सांगितला. भाषा हे समाज परिवर्तनाचे माध्यम असून, विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या माध्यमातून समाज परिवर्तन करावे. असे मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या विविध कविता आणि लेख या 'युवास्पंदन' भित्तीपत्रिकेचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ.संदीप वाकडे लिखित "गीतमाला: आस्वाद व आकलन" या समीक्षणात्मक ग्रंथाचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध कविता व गीतांचे गायन करून कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे (S M Joshi College) प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून, त्यामधून करिअर करण्याच्या अनेक संधी आज उपलब्ध झालेल्या आहेत. भारतामध्ये ए.आय. सारखी नवीन टेक्नॉलॉजी येऊ घातलेली आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करून त्यामध्ये आपले करिअर करावे. असे मत प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राधाकिसन मुठे यांनी तर पाहुण्यांचा व अध्यक्षांचा परिचय डॉ.अतुल चौरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा.शुभम तांगडे (जैन) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नम्रता कदम, डॉ.शीतल कोरडे यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रो.डॉ.किशोर काकडे, प्रा.किसन पठाडे, प्रा.संजय अहिवळे, प्रो.डॉ.दिनकर मुरकुटे, प्रा.अविनाश जाधव, प्रा.धीरेंद्र गायकवाड, प्रा.मोहिनी शेवकरी व बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.