
पिंपरी, दि. 9 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या वतीने "गाथा सन्मानाची" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपले अमूल्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला.
हा सन्मान सोहळा रविवार, ९ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजता गोदावरी आंगण, बोऱ्हाडे वाडी, मोशी येथे पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी केले. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या, विशेषतः परिचारिका, शिक्षिका, ब्युटीशियन, पोलीस कॉन्स्टेबल, तसेच इतर विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांना शहर अध्यक्ष कविता आल्हाट यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

महिलांसाठी विविध खेळांचे, कलागुणांचे प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या "गाथा सन्मानाची" या उपक्रमाद्वारे महिलांना प्रेरणा देण्याचा आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.