
- २०० हून अधिक नागरिकांचे नैसर्गिक नदीकिनाऱ्यांसाठी एकजूट
- पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या रक्षणासाठी घेतला पुढाकार
चिंचवड, ९ मार्च २०२५ – आज चिंचवड येथील चाफेकर चौकात २०० हून अधिक नागरिकांनी मानवी साखळी तयार करून, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) नदीकाठ विकास (RFD) प्रकल्पाचा विरोध केला आणि स्थानिक नद्यांच्या शुद्धीकरणासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
नागरिकांनी नदी प्रदूषण रोखणे, १००% सांडपाणी प्रक्रिया सुनिश्चित करणे आणि कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करता नैसर्गिक नदीकिनारे जपण्याची गरज अधोरेखित केली. या आंदोलनात अनेक स्थानिक स्वयंसेवी संस्था, पर्यावरण संघटना आणि सामाजिक प्रतिष्ठानांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
सकाळी ८ वाजता चाफेकर चौकात जमलेल्या नागरिकांनी पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या आरोग्य व भविष्यासाठी चिंता व्यक्त केली. या नद्या पिंपरी-चिंचवडच्या ३० लाखांहून अधिक नागरिकांसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहेत. नागरिकांनी नद्यांचे नैसर्गिक स्वरूप टिकवण्यावर भर दिला आणि जैवविविधता व पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित केली. नदीकिनारी झाडे, वन्यजीव आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्याचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी नदीकिनारी कोणत्याही प्रकारची बांधकामे नकोत, तर नैसर्गिक किनारे जपले जावेत, अशी मागणी केली.

ही मोहीम नदीसंवर्धनाविषयी जागृती निर्माण करण्याचा आणि RFD सारख्या मोठ्या विकास प्रकल्पांमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोका समजावून सांगण्याचा एक भाग आहे. नागरिकांनी या प्रकल्पाच्या फायदे-तोट्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्याचे परिणाम आरोग्य आणि पर्यावरणावर विपरीत पडू शकतात, असे सांगितले. त्यांनी प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले व मागण्या पूर्ण न झाल्यास पुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
पिंपरी-चिंचवडमधील नद्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष आणि प्रदूषणाचा फटका बसत आहेत. स्थानिक स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी आणि लोकप्रतिनिधींनी नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी वारंवार मागणी केली असली, तरी प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नद्या पाणीपुरवठ्यासोबतच सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाच्या आहेत, मात्र त्यांची हेळसांड होत आहे. यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी, पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी मानवी साखळीच्या माध्यमातून आपला विरोध नोंदवला. या आंदोलनातून प्रत्येक पिंपरी-चिंचवडकराने नद्यांचे रक्षण करण्यासाठी पुढे येण्याची जबाबदारी अंगीकारावी, असा संदेश दिला.