- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
मुंबई : कोरोना महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांचा ‘महाराष्ट्र कोविड योद्धा’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा हस्ते कुंदा भिसे यांना ‘महाराष्ट्र कोविड योद्धा पुरस्कार’ देण्यात आला. शुक्रवारी ( ता. ८ ऑक्टोबर) हा सोहळा मुंबई येथे राजभवनात पार पडला.
यावेळी राज्यभरातील विविध ठिकाणच्या अनेक प्रतिष्ठित डॉक्टर, अधिकारी, समाजसेवक यांच्यासह समाजातील विविध कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुंदा भिसे यांना प्रमाणपत्र प्रदान केले. तसेच उन्नती सोशल फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
त्यावेळी आयोजकांचे आभार व्यक्त करताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या की, दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टने आमच्या कार्याची दखल घेऊन आमचा जो सन्मान केला आहे. त्याबद्दल फाऊंडेशनच्या वतीने व समस्त पिंपळे सौदागरवासीयांच्या वतीने आम्ही, त्यांचे आभारी आहोत. कोरोना संकटकाळी आपण समाजाचे काही देणे लागतो याच उदात्त भावनेतून उन्नती सोशल फाउंडेशनने कार्य केले. या पुरस्कारामुळे भविष्यात आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, अशा शब्दांत त्यांनी संयोजक दीपाली सय्यद यांचे आभार मानले.