पुणे (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित एस. एम. जोशी कॉलेज हडपसर, पुणे येथे डॉ. एन. एस. गायकवाड प्राचार्य म्हणून रुजू झाले आहेत. ते रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य, पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, तसेच ‘रयत इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ साताराचे ते संचालकही होते. ते रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य आहेत. भारतीय भौतिकशास्त्र संघटनेचे ते आजीवन सदस्य आहेत. संशोधनासाठी युरोपियन युनियनची पोस्ट डॉक्टरेटसाठी फेलोशिप त्यांना प्राप्त झाली होती. त्याआधारे त्यांनी ‘नॕशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च बेल्व्हू पॕरिस’ येथे सव्वा वर्ष संशोधन केले आहे.
त्यांनी महाविद्यालयासाठी ‘गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली’ स्थापन केली. ज्यामध्ये वैयक्तिक शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. नॕक (NAAC) साठी ही प्रणाली खूप उपयुक्त आहे. रयत शिक्षण संस्था, साताराच्या 40 महाविद्यालयांमध्ये रयत गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली वापरली जाते. बत्तीस वर्षे अध्यापनाचा अनुभव त्यांना आहे. अध्यापनाबरोबरच पंधरा वर्षे त्यांनी प्राचार्य म्हणूनही उत्तम काम केले आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न असतो. तटस्थ दृष्टी ठेवून संशोधन करणारे ते संशोधक अभ्यासक आहेत.
सामाजिक बांधिलकी जोपासणारे ते उत्तम प्रशासक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांचे अनेक संशोधनपर लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी तज्ञ व्यक्ती म्हणून सहभाग घेऊन मार्गदर्शन केले आहे. त्यांनी अध्ययन, अध्यापन, संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच झेकरिपब्लिक या देशातील आंतरराष्ट्रीय सिंपोजीएममध्ये सादर केलेल्या पोस्टरसाठी त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. रोटरी क्लब आफ मंचर, पुणे याचा ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, आय.क्यू. ए.सी. चे प्रमुख डॉ.किशोर काकडे, स्टाफ वेल्फेअर कमिटीचे प्रमुख डॉ. अशोक पांढरबळे, सर्व प्राध्यापक, सेवक इत्यादींनी प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांचे हार्दिक स्वागत केले.