गरजू मुलींच्या रूपातील नवदुर्गांना घेतले दत्तक | उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा स्तुत्य उपक्रम

पिंपळे सौदागर : समाजातील अनेक मुली घरची आर्थिक परिस्थिती गरिब असल्याने शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांची स्वप्ने लहानपणीच विरून जातात. मात्र, समाजातील अशा नऊ मुलींचा सर्व शैक्षणिक खर्च उचलत त्यांच्या रूपात नवदुर्गांना पाहात उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी त्यांना दत्तक घेतले आहे. विजयादशमीच्या निमिताने या नवदुर्गांचे पुजन करून त्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे व आवश्यक वस्तू देण्यात आल्या.

पिंपरी सौदागर येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी रमेश वाणी, आर. के. पाटील, सखाराम ढाकणे, राजू भिसे, अजिंक्य भिसे समाजसेविका शारदा मुंढे, अशोक वारकर, दिलीप नेमाडे, उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतलेल्या या मुलीत अनेक मुली अनाथ, गतीमंद आहेत. तर काही पालकांचे हातावरचे पोट आहे. अशा मुलींबाबत कुंदा भिसे यांनी दाखविलेल्या उदारपणामुळे त्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येणार आहेत. याबाबत त्यांच्या पालकांनी कुंदा भिसे यांचे आभार मानले असून या उपक्रमाचे समाजाच्या सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

यावेळी शारदा मुंढे म्हणाल्या, “समाजात असे लोक आहेत, जी आपले कुटूंब संभाळून समाजासाठी काम करतात. आपल्या मुलांच्या भाकरीच्या तुकड्यातून कोरभर भाकर इतरांच्या लेकरांना देतात. अशापैकी एक उन्नती फाउंडेशनचे काम आहे. फाउंडेशनचे संजय भिसे व कुंदाताई भिसे यांचे खुप मोठ योगदान आहे. कुंदाताई यांनी आज तर खुप आगळावेगळा उपक्रम राबवला. या उपक्रमाला मला बोलवले, हे माझे भाग्य मानते.”

गरिबांच्या, वंचितांच्या मुलींनीही डॉक्टर, इंजिनिअर, वकील व्हावे. आपले व आपल्या पालकांचे, देशाचे नाव मोठे करावे. या हेतूने हा उपक्रम राबविला आहे. समाजातील विविध मंडळानी अनावश्‍यक खर्च टाळून गरजू मुलांना मदतीचा हात दिला पाहिजे.”

  • कुंदा भिसे, संस्थापक, उन्नती फाउंडेशन

मला दोन मुली असून माझा चप्पल शिकवण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायात जास्त पैसे मिळत नसल्याने मला आर्थिक अडचणी असते. त्यामुळे मुलींचे शिक्षण करणे शक्‍य नव्हते. मात्र, उन्नती फाउंडेशनच्या कुंदाताई यांच्याबाबत माहिती मिळाली. मी कुंदाताईंना भेटुन परिस्थिती सांगितली असता, त्यांनी माझ्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. त्याबद्दल मी कुंदाताई यांचा आभारी आहे.”

  • राहुल मेहेंदळे, पालक

उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.