पिंपरी चिंचवड : महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे चिखली-कुदळवाडीतील नागरिक वैतागले आहेत. या परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा यंत्रणा दोषमुक्त आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महावितरणला नव्या कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चिखली प्राधिकरण, राजे शिवाजीनगर (पेठ क्र. १६) जाधववाडी, पंतनगर, कुदळवादी परिसरात तर मंगळवारी (दि.१९) रात्री दहा वाजता बत्तीगुल झाल्यामुळे हजारो नागरिक घामाघूम झाले होते. अनेक सोसायट्यामधील पाणी उपसा सलग पाच तास वीज पुरवठा नसल्यामुळे बंद पडला होता. असे नागरिकांनी सांगितले.
औद्योगिक वापरासाठी असलेल्या उच्चदाब वाहिनीवरून येथील घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मोशी येथील महावितरण कार्यालयाचा देखभाल आणि तांत्रिक विभागाचे येथील कामकाजामध्ये बिले वसूल करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही. असाही आरोप नागरिकांनी केला आहे.
गेली १५ वर्षे या परिसरातील भूमिगत केबल बदललेल्या नाहीत. त्यामुळे त्या वारंवार जळतात. दुरुस्ती देखभालीसाठी कंत्राटी ठेकेदार संस्था नेमल्यामुळे तात्पुरते काम केले जाते. जुन्या केबल बदलून उच्च प्रतीच्या केबल बदलल्याशिवाय येथील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळणार नाही. राजे शिवाजी नगर, पंतनागर, जाधववाडी मधील वाढती लोकसंख्या, एकूण घरगुती ग्राहक आणि निवासी क्षेत्राचे सर्वेक्षण करून नवीन रोहित्रे, डीपी बॉक्स बसवले पाहिजेत. सर्व काम तात्पुरत्या स्वरूपाचे असल्यामुळे मेंटेनन्स खर्च वाढतो. त्याचा फायदा ठेकेदार मंडळींना होतो. असे येथील सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे.
झिरो ब्रेकडाऊन, २४ तास वीजपुरवठा या घोषणा कागदावरच राहिलेल्या आहेत. मोशी येथील महावितरणचे ग्राहक संपर्क, तक्रार निवारण केंद्र बंद असते. असे अनेक तास बंद वीज नसल्यामुळे येथील इंटरनेट, वाय फाय, पाणी पुरवठा सेवा सेवा बंद पडते. असे रहिवाशांनी सांगितले.