Covid-19: कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याच्या वारसाला मिळणार 75 लाख; नोकरीही

Covid-19: कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याच्या वारसाला मिळणार 75 लाख; नोकरीही
  • पिंपरी चिंचवड महापालिका अधिकारी व कर्मचारी सुरक्षा कवच योजनेअंतर्गत अर्थसहाय्य; महापौर माई ढोरे यांची माहिती

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी (पुणे) : कोरोना विषाणूवर (कोवीड-१९)नियंत्रण मिळविण्यासाठी व त्याचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. ही जबाबदारी पार पाडत असतांना त्यांचा प्रत्यक्ष कोरोनाग्रस्त रूग्णांशी संपर्क येत आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच योजनेअंतर्गत कोरोना संसर्ग होवून दिवंगत झाल्यास त्यांच्या वारसांना राष्ट्रीय स्वास्थ्य योजनेअंतर्गत पन्नास लाख, महापालिका कामगार निधीतून पंचवीस लाख रूपयांचे अर्थसहाय्य व त्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आली.

तसेच वारस नोकरी न घेतल्यास अतिरिक्त पंचवीस लाख रूपये देण्यात येणार आहेत. कोरोना विषाणू कोवीड १९ प्रतिबंध व उपद्रव याकामी महापालिकेकरीता सेवा देणारे कंत्राटी व मानधनावरील कामगारांना या योजनेत सामावून घेण्यात आले असून त्यांचेही कोरोना प्रादू्र्भावामुळे निधन आल्यास त्यांचे वारसांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन अंतर्गत पन्नास लाख रूपये व महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त २५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली. त्याबाबतचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निर्गत केलाचेही त्यांनी सांगितले.

तसेच महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त २५ लाख रूपये अथवा महापालिका सभा व महाराष्ट्र शासनाचा मंजूरीनंतर विशेष बाब म्हणून कायदेशीर वारसास महापालिका सेवेत नियुक्तीचा लाभ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या योजनेची मुदत ३० मार्च पासून ९० दिवसांपर्यत असणाऱ आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचे अधिकार आयुक्त व कामगार कल्याण निधी समितीला देण्यात आले आहेत.