covid-19 : पिंपरी-चिंचवड शहर मध्यरात्रीपासून होणार सील

covid-19 : पिंपरी-चिंचवड शहर मध्यरात्रीपासून होणार सील

पिंपरी (लोकमराठी) : कोरोना विषाणूने जगभरात थैमान धालते असून देश, राज्याबरोबर शहरातही कोरोना बाधितांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी रविवारी (दि. 19 एप्रिल) मध्यरात्री बारापासून 27 एप्रिलपर्यंत संपूर्ण शहरच सील करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहराच्या सर्व सीमा आणि प्रमुख रस्ते बंद करण्यात आले.

महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नागरिकांच्या हालचाली व बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्यासाठी संपूर्ण शहर सील केले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून ( दि. 20) नागरिकांना काही सवलती देण्यात येणार होत्या. मात्र, त्या दिल्यास कोरोनाचा आणखी प्रसार होऊ शकतो.

त्यात शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असून पुणे शहरासह चाकण, हिंजवडी औद्योगिक क्षेत्र लागून आहे. त्यामुळे नोकरी आणि कामानिमित्त नागरिकांचे येणे-जाणे करणार. परिणामी प्रसार जास्त होऊ शकतो. तो रोखण्यासाठी शहर सील करणे गरजेचे आहे. मात्र, या आदेशातून महापालिका, पोलिस, राज्य व केंद्र सरकारचे कर्मचारी, त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवेच्या वेळेत बदल
बँका, किराणा माल, फळे, भाजीपाला, मटण, चिकन व अन्य जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने यांची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 अशी असेल. एटीएम मात्र नियमित सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तू, तयार अन्न व औषध वाटप सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहतील. रुग्णालये, दवाखाने आणि मेडिकल स्टोअर्स पूर्ण वेळ सुरू राहतील. मोशी उपबाजार विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसारच सुरू राहणार आहे.



Actions

Selected media actions