रहाटणी-काळेवाडीतील रस्ते दुरूस्त करा ; माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची मागणी

रहाटणी-काळेवाडीतील रस्ते दुरूस्त करा ; माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची मागणी

पिंपरी, ता. ११ : रहाटणी – काळेवाडी परिसरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कॉक्रीटीकरण, भूमिगत गटारे, जलवाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असून नागरिक त्रस्त आहेत. रहाटणी – काळेवाडीकरांची रस्ते समस्या महापालिकेने मार्गी लावावी, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.

याबाबत तापकीर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहाटणी – काळेवाडी परिसरातील श्रीनगर, शास्त्रीनगर, तापकीरनगर, जोतिबानगर, काळेवाडी गावठाण, आझाद चौक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कॉक्रीटीकरण, भूमिगत गटारे, जलवाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. तीन ते सहा महिन्यांपासून अंतर्गत रस्ते खोदून ठेवल्याने रहिवाशांना कसरत करावी लागत आहे.

रस्तेखोदकामामुळे जलवाहिन्या फुटाणे, वीज पुरवठा खंडित होणे, इंटरनेट – दूरध्वनी सेवा विस्कळीत होणे आदी प्रकार वारंवार घडत आहेत. वाहनांच्या अपघातामुळे अनेकांना जायबंदी व्हावे लागत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही अधिकारी काणाडोळा करतात. अधिकारी – ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे रहाटणी – काळेवाडीकर त्रस्त आहेत. प्रशासक या नात्याने आयुक्तांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रस्तेसमस्येतून रहाटणी – काळेवाडीकरांची मुक्तता करावी, अशी मागणी मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.