ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाला तारक : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे

ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाला तारक : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे
काळेवाडी, राजवाडा लॉन्स : श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप करण्यात आले.

पिंपरी : ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यास ज्ञानाच्या तेजाचे चक्र तुमच्या भोवती फिरेल. ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाला तारक असून मारक नाही. दररोज पाच मिनीटे तरी ज्ञानेश्वरीचे वाचन केले, तरी तुमच्या जीवनातील अनेक गोष्टींमध्ये बदल होईल. असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे यांनी येथे केले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त मातंग साहित्य परिषदेच्या वतीने येथील राजवाडा लाॅन्स येथे ज्ञानेश्वरी घरोघरी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत हेमंत हरहरे व नरेंद्र पेंडसे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले.

त्याप्रसंगी निवृत्त शिक्षण पर्यवेक्षक दादाभाऊ आल्हाट, अनय मुळे, पुरूषोत्तम तांबोळी, नाना कांबळे, बापु वाघमारे, बाळासाहेब खंदारे, राजू आवळे, सुमित देवकुळे, संदेश काटे, राजेश राजने, बाळासाहेब लोंढे, भगवान पवार आदी उपस्थित होते.

श्री. हरहरे म्हणाले की, ” आता तुम्ही शिकलेच पाहिजे, असे कोणताही नेता तुम्ही सांगणार नाही. कारण तुम्ही नाही शिकला तर तुमच्यावर त्यांना राज्य करता येईल. मात्र, शिकत असताना आपल्या देशाचा व इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.”

ज्ञानेश्वरीची महती सांगताना नरेंद्र पेंडसे म्हणाले की, ” श्री ज्ञानेश्वरी म्हणजे नेमकी काय? तर आपल्या हिंदू धर्माचे सर्व तत्वज्ञान वेद उपनिषदात आहेत. या सर्व तत्वज्ञानाचा सार भगवंतानी गिता निर्माण करून सांगितला. मात्र, हे ज्ञान संस्कृतमध्ये बंदीस्त होते. धर्मशास्त्राच्या पगड्यामुळे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचले नाही. मात्र, ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने संत ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी खुले केले. ”

या कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक मातंग साहित्य परिषदचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. धनंजय भिसे यांनी केले. तर दादाभाऊ आल्हाट यांनी आभार मानले.