पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांनी घेतला चित्रकला स्पर्धेचा आनंद

पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांनी घेतला चित्रकला स्पर्धेचा आनंद
  • उन्नती सोशल फाउंडेशन व सप्तर्षी फाउंडेशन त्यांचा संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त स्तुत्य उपक्रम

पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन व उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन येथे विशेष-दिव्यांग मुलांकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विशेष मुलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व सर्व सहभागी मुलांना उन्नती फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेत अरिफा बागवान हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर हर्षवर्धन सुरूशे याने द्वितीय व प्रियांका गरुड हिने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच जगदीश बडगुजर यास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

विशेष मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम सप्तर्षी फाउंडेशन व उन्नती सोशल फाउंडेशनच्या विशेष पुढाकाराने राबविण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी सप्तर्षी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली मुळे, सचिव श्रीकांत चव्हाण, सदस्य वरूण सावरे यांचे मार्गदर्शन मिळाले.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, सप्तर्षी फाउंडेशनचे संस्थापक सचिव मनोजकुमार बोरसे, विशाल पवार, विशाल गणधुरे, भूषण गायकवाड, प्रमोद देवकाते, किरण जाधव, सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन तसेच त्यांचे सहकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.