हडपसर, ता. १ सप्टेंबर (प्रतिनिधी) : संशोधन ही अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या हातून समाजोपयोगी संशोधन घडायला हवे. आपण लोकांच्या कल्याणासाठी संशोधन करावे. जर आपण गुणवत्तापूर्ण संशोधन केले तर त्याची दखल जागतिक स्तरावर घेतली जाते. महात्मा जोतीराव फुले, संत ज्ञानेश्वर यांनी मराठी साहित्याला दिलेले योगदान आजही उपयुक्त आहे. मार्गदर्शकाने स्वतःची गुणवत्ता राखून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायला पाहिजे. असे विचार प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मराठी संशोधन केंद्राच्यावतीने आयोजित मराठी पीएच.डी. सिनोप्सेस सादरीकरणाच्या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. याप्रसंगी डॉ. राजेंद्र थोरात, डॉ. नानासाहेब पवार, डॉ. अरुण कोळेकर, मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे तज्ञ व्यक्ती म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नम्रता मेस्त्री यानी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल चौरे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. संजय जडे, डॉ. संजय जगताप, डॉ. संदीप वाकडे, प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.