ज्येष्ठ मंडळींनी आरोग्य संपन्न करून शतायुषी व्हावे – अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ

ज्येष्ठ मंडळींनी आरोग्य संपन्न करून शतायुषी व्हावे - अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ

पिंपरी, दि. १ ऑक्टोबर २०२२ : ज्येष्ठ मंडळींनी आपल्या जीवनाची वाटचाल आनंदाने, आरोग्य संपन्नतेने करून शतायुषी व्हावे. असे प्रतिपादन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने एक ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी पोलिस उपआयुक्त मंचक इप्पर, समाज विकास विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, समाज विकास अधिकारी सुहास बहादरपूरे, चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव दराडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांचे समतादूत प्रशांत कुलकर्णी व संगिता शहाडे तसेच शहरातील विविध भागातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

ज्येष्ठ मंडळींनी आरोग्य संपन्न करून शतायुषी व्हावे - अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ

यावेळी समाज कल्याण व बार्टीच्या योजनांची माहिती देत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या विविध सूचनांचा सकारात्मक विचार करून महापालिकेच्या वतीने जेष्ठ मंडळींना सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी सध्याची स्थिती पाहता जीवनस्तर सुधारत असून ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी ज्येष्ठांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे,त्यांचा आदर करावा तसेच त्यांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा उपयोग करून घ्यावा, असे सांगून त्यांनी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी प्रास्ताविकात शहरातील विविध भागात १३४ ज्येष्ठ नागरिकांचे नोंदणीकृत संघ असल्याचे सांगितले. दर वर्षी ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ एक ऑक्टोबर ह्या दिवशी तज्ञांचे व्याख्यान, मार्गदर्शन तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम विभागामार्फत घेण्यात येत असून यावर्षी ११६ ज्येष्ठ नागरिक संघाना भेट म्हणून टीव्हीचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अरुण बागडे, कार्याध्यक्ष वृषाली मरळ, सरचिटणीस हरिनारायण शेळके, पदाधिकारी मधुकर कसबेकर, विठ्ठल चौधरी, शांताराम सातव, बाबुराव फुले, गजानन ढमाले, बि. आर. माडगूळकर, चंद्रकांत पारखी, ईश्वर चौधरी, खंडू बिरदवडे, नारायण गोडसे, माधव अडसुळे, सुभाष सराफ, सुनिता कोकाटे, बाळकृष्ण गायकवाड, हेमचंद साळवे,दुंडय्या स्वामी, होनाजी कोंढावळे, तुकाराम कुदळे, चंद्रशेखर हुनशाळ, रमेश फाटके, सदाशिव पाटील, विष्णुपंत गुल्हाने, यशवंत साने आणि पंडित खरात यांचा मान्यवरांच्सया हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच यावेळी “आनंद मेळावा” या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अरुण बागडे यांनी सत्काराला उत्तर देताना महानगरपालिका दरवर्षी मोठ्या उत्साहाने ज्येष्ठ नागरिक दिन विविध उपक्रमांनी साजरा करीत असते त्याबद्दल महापालिकेचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात सुरूवातीला ख्यातनाम व्याख्याते व जेष्ठ नागरिक अशोक देशमुख यांनी “हसत हसत तणाव मुक्ती” या विषयावर व्याख्यान दिले. त्यानंतर जयेंद्रु मातोश्री प्राॅडक्शन प्रस्तुत हिंदी,मराठी जून्या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम विजयकुमार उलपे यांनी सादर केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी, सूत्रसंचालन जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर समाज विकास अधिकारी सुहास बहादरपूरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.