विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयावर ‘पे अँड पार्किंग’च्या ठरावाची होळी

  • पे अँड पार्किंग विरोधातील आंदोलनाला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचा पाठिंबा

पिंपरी चिंचवड: शहरामध्ये शिस्तीच्या नावाखाली जनतेचा विरोध जुगारून केवळ महसूल गोळा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ” पे अँड पार्किंग ” धोरण लागू केले. याविरोधात अपना वतन संघटनेने सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे . तसेच सर्वसामान्य जनतेच्या भावना राजकीय पक्षांच्या जबाबदार लोकप्रतिनिधीं समोर मांडण्याचा व पे अँड पार्किंग धोरण चुकीचे आहे हे सांगण्याकरता त्यांच्या स्थानिक कार्यालयावर आंदोलने सुरु केली आहेत.

याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या वतीने शनिवारी (दि. ३१ जुलै) विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यालयावर पे अँड पार्किंग च्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात करण्यात आला. नागरिकांनी पे अँड पार्कींग चा प्रस्ताव जाळून , पे अँड पार्किंग रद्द करा, पे अँड पार्किंग च्या माध्यमातून होणारी पिळवणूक थांबवा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

आंदोलनावेळी मार्गदर्शन करताना अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले कि, शहराच्या विकास आराखड्यामध्ये वाहनतळाची आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्याचा वापर करावा. रस्त्याच्या कामासाठी अनेक नागरिकांना बेघर करून त्या जागेवर पे अँड पार्किंग करणे योग्य नाही. रेस्टोरंट , हॉस्पिटल , व्यावसायिक इमारती याना पार्किंग नसताना बांधकाम परवानगी दिली आहे परंतु त्याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य नागरिकांकडून वसूल केला जात आहे.

दैनंदिन कामासाठी बाहेर पडणारे इंडस्ट्रियल कामगार , नोकरदार महिला , सेल्समन , पोलीस कर्मचारी , व्यापारी ,अपंग नागरिक ,ज्येष्ठ नागरिक ,विधवा महिला अशा लोकांना दिवसातून अनेकवेळा पार्किंगचे पैशे भरावे लागत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड आर्थिक लूट होत आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी पे अँड पार्किंग विरोधात सभागृहात आवाज उठवावा व त्याचा विरोध करावा. सदर ठिकाणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी आंदोलनात सहभागी होऊन पे अँड पार्किग विरोधातील आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला . यावेळी त्यांनी येणाऱ्या सर्वसाधारण सभेत पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोध करणार असल्याचे सांगितले व अपना वतन संघटनेच्या पुढील आंदोलनात ताकदीनिशी सहभागी होण्याचे आश्वासन दिले.

या आंदोलनामध्ये अपना वतन संघटनेचे शहर कार्यध्यक्ष हमीद शेख , महिला अध्यक्ष राजश्री शिरवळकर , सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार, संघटक निर्मला डांगे, नॅशनल ब्लॅक पँथर च्या संगीत शहा, तौफिक पठाण, छावा मराठा युवा महासंघचे धनाजी येळकर पाटील, संभाजी ब्रिगेड चे सतीश काळे, सालार शेख इमाम नदाफ, सुधीर वाळके, संकल्प फाउंडेशनचे गणेश जगताप, केशव बुडगल, लक्ष्मण पांचाळ यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Actions

Selected media actions