पिंपरी : आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित (Mutation) विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केलेले असून त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकुण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे.
- या सहा जणांपैकी ३ जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर तिघे त्यांचे निकटसहवासित आहेत.
- नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिध्द झाले आहे.
- या तिघींच्या १३ निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून त्यातील या महिलेचा ४५ वर्षाचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि ७ वर्षांच्या दोन मुली या कोविड बाधित आल्या होत्या. या तिन्ही निकटसहवासितांमध्ये देखील ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे.
- नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर ५ जणांना कसलीही लक्षणे नाहीत.
- या सहा जणांपैकी तिघे हे १८ वर्षाखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे.
- हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
या शिवाय पिंपरी चिंचवड शहरामध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांचे देखील क्षेत्रिय कार्यालयस्तरावर सर्वेक्षण सुरु आहे.
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पुर्ण करावे. मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच मागील महिन्यातील जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलेले आहेत त्यांनी आपली कोविड १९ तपसणी करुन घ्यावी असे सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येत आहे.