विनोदाची इंटरनॅशनल कंपनी: जॉनी लिव्हर

विनोदाची इंटरनॅशनल कंपनी: जॉनी लिव्हर

दासूृ भगत

आशिया खंडातील सर्वात मोठी झाेपडपट्टी धारावी ही काही अभिमानाने सांगायची मुळीच गोष्ट नाही पण धारावीचा उल्लेख असाच होतो. धारावी माटूंगा लेबर कॅम्प वस्तीत या पोराचा जन्म झाला. येथील मुलांना बालपण नावाची अवस्था असते का? तिन बहिणी आणि दोन भावाच्या कुटूंबात हा सर्वात मोठा. जॉन राव हे याचं नाव. खूप पूर्वीच आई वडील आंध्र प्रदेश सोडून मुंबईत आले होते. वडील हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीत मशीन ऑपरेटर होते. जॉन १० वर्षांचा असताना कुटूंब किंग्ज सर्कल परीसरातील झोपडपट्टीत स्थायिक झाले. निसर्ग पावसाळ्यात अशा वस्तीवर जरा अधिकच उदार होतो. झोपडीतून जेथून जमेल तेथून तो कुटूंबाना कडकडून भेटत राहतो. जॉन पण आपल्या भावा बहिणी सोबत खाटेवर किडूक मिडूक सांभाळत बसून राही. आई वडील घरात साचलेले गुडघाभर पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत. छपरातून पण गळती सुरू होई मग जॉन एखादे भांडे घेऊन त्यात ते पाणी आपल्या आठवणी सहीत साठवत बसे.

ही वस्ती म्हणजे मिनी इंडियाच होता व आजही आहे. येथे भारतातील सर्वच राज्यातील माणसे भविष्याचे गाठोडे घेऊन आलेली. जॉनच्या शेजारी श्रीलंकेतील ही कुटूंब होते. सभोवताल इतका विविधतेने नटलेला त्यात मानवी स्वभावांचे शेकडो नमूने बघत जॉन त्यांच्या नकला करू लागला. त्याला हे मनापासून आवडत असे. अशा परीसरात संस्कृती आपल्या सर्व प्रथा परंपंरा आग्रहाने जपत असते. आनंदाचे क्षण जे काय पदरात पडतात ते येथील सण व त्यातील उत्सवामुळे. मग जॉन धमाल करायचा. लोकानां नकला करून हसवायचा, मनोसोक्त नाचून घ्यायचा. जॉनचा एक सिंधी मित्र होता तो म्हणायचा-‘अरे बाबा काही तरी काम , टपोरी सारखा इकडे तिकडे फिरून फुकट वेळ घालवू नकोस’ त्याने जॉनला पेन विकायचे काम दिले तेव्हा तो १४-१५ वर्षांचा होता. जॉनला चित्रपट कलाकारांचा आवाज काढण्याचा छंद होता. पेन विकताना तो निरनिराळ्या अभिनेत्याचे आवाज काढत असे त्यामुळे त्याचे सर्व पेन विकले जात.

वयाच्या १७ व्या वर्षी जॉनने स्टेज शो करायला सुरूवात केली. अभिनेत्याचे आवाज काढण्यात जॉन तरबेज होताच आता त्याला स्टेज मिळू लागले. १८ व्या वर्षी जॉन वडील जिथे काम करत होते त्या हिंदुस्तान लिव्हर कंपनीतल्या कॅटॅलिस्ट विभागात कामगार काम करू लागला. हा विभाग म्हणजे कामगारासाठी एक प्रकारची शिक्षाच असे. जॉनने इथे ६ वर्षे काम केले. चार्ली चॅप्लीन यांनी देखिल अशीच पडेल ती कामे केली होती. या कामातही जॉनने भरपूर आनंद घेतला. येथे जॉन आपल्या ऑफिसरच्या नकला करीत असे व कामगारानां हे कोण अधिकारी आहेत ते ओळखायला सांगे. आपल्या नकलांनी अधिकारी वर्गही खुश होत असे. सुरेश भोसले नावाचा जॉनीचा एक खास मित्र होता तोही चांगला कॉमेडियन होता. तो जॉनच्या विभागात आला की त्याला जॉनीSSS जॉनीSSS…लिव्रSS लिव्रSS म्हणत इको काढायचा. संपूर्ण कंपनीत मग हेच नाव परीचित झाले व जॉन रावचा “जॉनी लिव्हर” झाला.

संगीतकार कल्याणजी-आनंदजी बंधू नवीन कलावंताना खूप मदत करत व त्यांच्यातील गुणानां आवर्जुन संधी देत. त्यांच्या स्टेजशो मध्ये जॉनी भाईला पण संधी मिळाली. चित्रपटातील ब्रेक देखिल कल्याणजी भाईमुळे मिळाला. त्यांच्या घरी एकदा बसलेला असताना चेन्नईचे एका निर्मात्याने कल्याणजीभाईकडे एखाद्या कॉमेडियन तीन चार दिवसासाठी उपलब्ध आहे का अशी विचरणा केली अन् कल्याणजीभाईनी जॉनीकडे बोट दाखविले आणि जॉनीभाई चेन्नईला पोहचले ते वर्ष होते १९८०. पहिल्यादांच कॅमेरा समोर उभे राहवयाचे असल्यामुळे जॉनीभाई वर बराच दबाव होता व ते काही रात्रभर झोपू शकले नाही. अगांत ताप आला व दुसऱ्या दिवशी ट्रेन पकडून पळण्याचा मनात विचार आला. पण तो विचार बाजुला सारत ते कॅमेराला सामोरे गेले. चित्रपटाचे नाव होते “ ये रिश्ता ना टुटे” हा योगायोगाच म्हणायला हवा की चित्रपटाच्या नावा प्रमाणेच जॉनीभाईचा चित्रपटसृष्टी सोबत आजही रिश्ता तुटलेला नाही. अभिनेत्री तबस्सुम यानी त्यांच्या ऑर्केस्ट्रात जॉनीभाईला सामील केले व त्यांनी निर्मित केलेल्या “हम पर तुम कुर्बान” या चित्रपटात संधी दिली. नंतर सुनील दत्त यांच्या “दर्द का रिश्ता” या चित्रपटातही जॉनीभाईला भूमिका मिळाली. या काळात “तेजाब”, “कसम”, “खतरनाक”, “जलवा”, “हिरो हिरालाल” असे चित्रपट केले. मात्र यशाची खरी चव चाखायला मिळली ती १९९३ मधील शाहरूख खानच्या “बाजीगर” या चित्रपटामुळे. या चित्रपटातील त्यांच्या बाबूलाल या पात्राने चित्रपटसृष्टीला जॉनीभाईची दखल घ्यायला भाग पाडले. त्यांच्या “छोटा छत्री” व “अस्लमभाई” या भूमिकापण लोकांनी डोक्यावर घेतल्या. या यशा बद्दल बोलताना जॉनीभाई म्हणतात-‘जब परमेश्वर की रोशनी आती है तो एक ताकद आती है आपके अदंर. और उस ताकदसे आप इन चिजोको फॉलो कर सकते है’ . सन १९९९ मध्ये फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यातील त्यांचा मायकेल जॅक्सनवरील आधारीत लाईव्ह सादरीकरण प्रचंड लोकप्रिय झाले.

जॉनीभाईचे मातृभाषा तेलुगू सहीत मराठी, हिंदी, तुलू व इंग्रजीवर चांगले प्रभूत्व आहे. त्यांनी तुलू भाष्ेतील “रंग” आणि तमीळ चित्रपट “अंबीरक्कू अलाव्हिलाई” चित्रपटातही भूमिका केली आहे. चार्ली चॅप्लिन यांचे डोळे सदैव करूणेनी ओथंबलेले असत तसेच जॉनीभाईच्या डोळ्यात कायम विस्फारलेले भाव दिसत असतात. जॉनीभाईआपल्या अंगभूत वैशिष्ठ्याने धारावीने जॉनरावला जगायला शिकवले हे ते आजही विसरलेले नाहीत. सोबतच्या सर्व जाती धर्माचे मित्र आजही त्यांच्या संपर्कात असतात. आपल्यातील चुकां आपल्याला खूप काही शिकवून जातात मात्र त्या चूका आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत या विचाराचे जॉनीभाई आपल्या कामातील चूका शोधत व त्या पुन्हा होऊ नये याची काळजी घेत आजही काम करतात. १९८४ मध्ये जॉनीभाईचे लग्न सुजाता बरोबर झाले त्यानां जेमी आणि जेस्सी ही दोन मुलं आहेत. मुलगी जेमी ही आपल्या वडिला सारखीच कॉमेडियन आहे तर भाऊ जीमी मोसेस हाही कॉमेडियन आहे.

पैसा हातात खेळू लागताच माणसाचे स्वत:वरील नियत्रंण अनेकदा सुटते व तो नको त्या सवयीत गुरफटू लागतो. जॉनीभाईनी आपल्या आयुष्यातील चांगल्या व वाईट दोन्ही सवयी कधी लपवून ठेवल्या नाही. त्यांच्या मुलाच्या मानेतील गाठीने बरीच वर्षे त्यांच्यातील पित्याला कासाविस केले होते. सुदैवाने अमेरिकेतील एका डॉक्टरांनी ज्यांनी नर्गीस दत्तवर उपचार केले होते, मुलाला जीवदान दिले. त्यांचा चुकलेला ट्रॅक त्यांच्या लक्षात आला अन् ते इतरांच्या सेवेत बराच दीर्घकाळ रमले. एक दिवस त्याच शाळेने त्यानां प्रमूख पाहूणा म्हणून बोलावले ज्या शाळेत ते ते बॅकबेंचर होते व फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे शाळा सोडावी लागली होती. तेव्हा त्यांनी मुख्याध्यापकांनी आवर्जुन विनंती केली की जे विद्यार्थी फी भरू शकत नाहीत त्यांची फी मी भरेन मात्र त्यानां शाळेतून काढून टाकू नका.

केवळ ७ वी पास झालेले जॉनीभाई आज ‘ऑक्सफर्ड टॉवर’या बहूमजली इमारतीतील उंचावरच्या अलिशान घरात राहतात. त्या उंचीवरूनही त्यानां स्लमवस्तीतला आपला भूतकाळ स्पष्ट दिसतो ही जमेची बाजू म्हटली पाहिजे. जॉनीभाई लोकानां गेल्या अनेक वर्षा पासून आपल्या अभिनयाने खळखळून हसवत आहेत. आज त्याच्याकडे संपत्त प्रतिष्ठा, प्रसिद्धी , लोकांचे अफाट प्रेम सर्व काही आहे. पण हे सर्व असले म्हणजे माणूस खरोखरच सुखी होतो का? मनात निरव शांतता वसते का? त्यानां आजही असे वाटते की ‘हास्य त्याच्या पासून मैलोगणती लांबच आहे’. हास्य हे आनंदाचे परीमाण असते का? मध्ये जवळपास १० वर्षे जॉनीभाई काहीच काम करत नव्हते तरीही मस्त मजेत राहात. एकदा पत्नी म्हणाली होती-‘तुमची कमाई बंद आहे तरी तुम्ही इतके आनंदी कसे? प्रभूचे गुणगाणं गाताय ते कसे?’ पैसा गरज आहे यात काही दुमत नाही पण तो आला की मनाला शांती मिळते असेही नाही. हे मर्म जॉनीभाईच्या आनंदाचे कारण आहे. आज त्यांचा जन्मदिवस…खूपखूप शुभेच्छा जॉनीभाई….