सुशिक्षित की फक्त शिक्षित? – जेट जगदीश

सुशिक्षित की फक्त शिक्षित? – जेट जगदीश

आज साक्षरतेचे प्रमाण वाढलेले आहे असं म्हणतात. आपल्या लक्षात येईल की, आपण साक्षर जरूर आहोत; पण अडाणी सुशिक्षित आहोत. वैज्ञानिक दृष्टीकोणाच्या अभावामुळे भाज्याफळे धुतल्यानंतरचे आणि स्वयंपाक घरातील भांडी विसळलेले पाणी पिण्यायोग्य नसले तरी झाडांना पोषक असते; ह्याची जाण नसल्यामुळे असे पाणी झाडांना देणे म्हणजे झाडांना निसत्व करणे आहे असे समजले जाते. ते पाणी डास वाढीस कारणीभूत ठरते, या समजापोटी सोसायटीतील शिक्षित मंडळी सोसायटीच्या आवारातील झाडांना ते पाणी घालण्यास विरोध करतात.

विद्युत निर्मितीसाठी पाण्याची गतिज ऊर्जा वापरून टरबाईन फिरवले जातात आणि नंतर जे पाणी बाहेर पडते त्या पाण्यातील ऊर्जा काढून घेतल्यामुळे ते उर्जाहीन पाणी शेतीला देणे किंवा झाडाला देणे उपयोगाचे नाही, असे समजणे जेवढे हास्यास्पद तेवढेच सोसायटीमधील झाडांना भांडी विसळल्यानंतरचे, तांदूळ वा भाज्याफळे धुतल्यानंतरचे पाणी झाडांना द्यायला विरोध करणे हास्यास्पद.

पण हेच पाणी कुण्या बाबाबुवाच्या पायाचे तीर्थ आहे किंवा शंकराला अभिषेक केल्यानंतरचे देवळाच्या ओहोळातले पाणी आहे असे सांगितले असते तर विरोध करणाऱ्यांनी ते आधी तीर्थ म्हणून प्राशन केले असते आणि मग झाडांना खुशाल घाला म्हणून परवानगी दिली असती.

म्हणतात ना, ‘अर्धवट ज्ञान हे धोकादायक असते’ तेच खरे. अशा अर्धवटांचे प्रबोधन आपल्याला करायचे आहे.