बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी कामगार नेते संभाजीराव शिरसाट यांची नियुक्ती

बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी कामगार नेते संभाजीराव शिरसाट यांची नियुक्ती 

पिंपरी : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपजिल्हाप्रमुख पदी कामगार नेते संभाजीराव शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील व जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या हस्ते लांडेवाडी येथील शिवनेरी निवासस्थानी शिरसाट यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

संभाजीराव शिरसाट हे कामगार नेते असुन ते शिवसेना प्रणित शिक्षक सेनेच्या पुणे विभागीय अध्यक्ष पदावर कार्यरत होते. शिरसाट हे बाळासाहेबांच्या विचाराचे कट्टर शिवसैनिक असुन त्यांनी शिक्षक सेनेमार्फत शिक्षण क्षेत्रातील कामगाराच्या अडचणी सोडविण्यासाठी अनेक आंदोलने करून त्यांना न्याय देण्याचे काम केले. शिक्षक-शिक्षकेतर कामगारांच्या हितासाठी त्यांनी केलेला संघर्ष व व्यापक कामामुळे पुणे जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.

शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांच्या शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा असुन त्यामार्फत हजारो सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेतात. त्याचप्रमाणे शिरसाट यांच्या काम करण्याच्या आक्रमक शैलीमुळे पिंपरी-चिंचवड, चाकण शहरात व पुणे जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच त्यांची शिक्षण क्षेत्रातील चांगली कामगिरी व दांडगा जनसंपर्क असल्याने २०१९ च्या शिक्षक मतदार संघात शिवसेनेचे दावेदार म्हणून ते उमेदवार होते.

दरम्यान, आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. शिरसाट हे सुशिक्षीत, अभ्यासू व आक्रमक असल्याने भविष्यात बाळासाहेबाची शिवसेना पक्षाची भोसरी येथे स्थानिक पातळीवर ताकद वाढेल व संघटन मजबूत होईल, अशी चर्चा भोसरीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. ते स्वतः इंद्रायणी नगर या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवार आहेत.

” माननीय हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांची प्रेरणा, उपनेते श्री. शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली व पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. भगवानशेठ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी निवड ‘शिवसेना उपजिल्हाप्रमुख’ पदी करून जो विश्वास दाखवला त्याबददल मी पक्ष नेतृत्वाचा आभारी आहे. येत्या काळात भोसरी विधानसभा क्षेत्रात जनतेच्या मनात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे विचार व युती सरकारची विकास कामे घरोघरी पोहोचविण्याचे काम करणार आहे, तसेच पक्षांचे संघटन मजबूत करण्यासाठी निष्ठेने प्रयत्न करणार आहे. ” – संभाजीराव शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमूख, पुणे.