अभ्यासिकेची सुविधा दिल्यास विद्यार्थी व तरुण वर्ग ग्रंथालयाशी जोडला जाईल- खासदार शरद पवार

अभ्यासिकेची सुविधा दिल्यास विद्यार्थी व तरुण वर्ग ग्रंथालयाशी जोडला जाईल- खासदार शरद पवार
  • मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न

मुंबई : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नवीन कार्यकारिणी, विश्वस्त व उपाध्यक्ष यांची संयुक्त बैठक आज संस्थेचे अध्यक्ष खा शरद पवार यांचे अध्यक्षतेखाली यशवंतरा़व चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत कार्यकारिणीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.तसेच यावेळी ना शरद पवार यांनी ग्रंथसंग्रहासमोरील अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे वाचकांचा ओघ वाढवता कसा येईल यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

वाचकांसाठी नवीन सोईसुविधा, नव्या उपक्रमांचे आयोजन, तसेच अभ्यासिकेची सुविधा दिल्यास विद्यार्थी व तरुण वर्ग जोडला जाईल अशा मार्गदर्शनपर सूचना शरद पवार यांनी केल्या.

उपाध्यक्ष डाॅ. भालचंद्र मुणगेकर, विद्या चव्हाण, शशी प्रभू प्रभाकर नारकर ,अमला नेवाळकर तसेच विश्वस्त खा. सुप्रिया सुळे, खा. संजय राऊत, प्रताप आसबे, अरविंद तांबोळी आणि संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

खा. संजय राउत, खा. सुप्रिया सुळे यांनी आगामी काळात ग्रंथालय सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण उपक्रम घेण्याबाबतचे मार्गदर्शन केले. तर डाॅ. भालचंद्र मुणगेकर यांनी मराठी भाषा व ग्रंथालय संवर्धनासाठी आर्थिक सक्षमीकरण महत्वाचे असून त्यासाठी सरकारची भूमिका महत्वाची ठरते अशी भूमिका मांडली

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव व मराठी संशोधन मंडळाचा अमृतमहोत्सव साजरा करते वेळी निरनिराळ्या उपक्रमांबद्दल कसा विचार करता येईल याबाबत संदर्भ विभाग कार्यवाह उमा नाबर यांनी सांगितले. प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे यांनी संस्थेच्या सर्वंकष विकासासाठी करता येणा-या कामाची,उपक्रमाची माहिती दिली. प्रत्येक शाखा सक्षम करणेसाठी अभ्यासपूर्ण कृतीशील नियोजन करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आगामी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय महाराष्ट्रातील मराठी भाषिक अभ्यासक व वाचकांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून सर्वतोपरी नियोजनबद्ध काम कार्यकारिणी करेल असा विश्वास कार्याध्यक्ष शीतल करदेकर व रविंद्र गावडे यांनी मान्यवरांना दिला.