MUMBAI:प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ…

मुंबई :- राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच नागरिकांना मोठा दिलासा दिला. आता शासकीय कामासाठी, प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याचा ताप कमी झाला आहे. अनेक प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यापूर्वी राज्य सरकारने 500 रुपयांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य केले होते. त्याशिवाय प्रमाणपत्र दिले जात नव्हते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उत्पन्नाचा दाखल, जात पडताळणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्रासह इतर अनेक प्रमाणपत्रासाठी 500 रुपये प्रत्येकी लागत होते. म्हणजे केवळ मुद्रांक शुल्कापोटीच विद्यार्थ्यांना वर्षाला 2 हजारांहून अधिकचा खर्च येत होता. पण आता हा खर्च वाचणार आहे. 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे बावनकुळे यांनी आदेश दिला आहे. यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार नाही. त्यांना मुंद्राक शुल्काशिवाय प्रमाणपत्र देण्यात येईल.