कोविड-19 विरुद्धच्या राष्ट्रव्यापी अभियानात एनसीसीचे कॅडेट सहभागी होणार

कॅडेट्सच्या तात्पुरत्या नियुक्त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

कोविड-19 विरुद्धच्या राष्ट्रव्यापी अभियानात एनसीसीचे कॅडेट सहभागी होणार

नवी दिल्ली, 2 एप्रिल : राष्ट्रीय छात्र सेनेने (एनसीसी) ‘एनसीसी योगदान अभियान’ अंतर्गत आपल्या कॅडेटच्या सेवांचा विस्तार करत कोविड-19 विरुद्धच्या राष्ट्रव्यापी अभियानात नागरी प्रशासनाला मदतीचा हात पुढे केला आहे. साथीच्या आजारा विरुद्धच्या लढाईत सहभागी असलेल्या विविध संस्थाच्या कार्यात आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्यासाठी एनसीसीने त्यांच्या कॅडेट्सच्या तात्पुरत्या रोजगारासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

एनसीसी कॅडेट्ससाठी नियोजित कामांमध्ये हेल्पलाइन / कॉल सेंटरचे व्यवस्थापन; मदत पुरवठा / औषधे / अन्न / आवश्यक वस्तूंचे वितरण; समुदाय सहकार्य; डेटा व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना रांगा लावून उभे राहण्याची व्यवस्था आणि रहदारी व्यवस्थापन यांचा समावेश आहे.मार्गदर्शक सूचनांनुसार कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी किंवा लष्करी कर्तव्य बजावण्यासाठी किंवा ज्या ठिकाणी अधिक प्रमाणत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत त्या जागांवर कॅडेट्स तैनात करू शकत नाहीत.

केवळ 18 वर्षा वरील वरिष्ठ विभागीय कॅडेट्सची नियुक्ती केली जाऊ शकते. कायमस्वरूपी शिक्षक किंवा सहयोगी एनसीसी अधिकाऱ्याच्या देखरेखी अंतर्गत 8 ते 20 जणांच्या छोट्या गटात त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.

स्वयंसेवक कॅडेट्सच्या तैनातीसाठी राज्य सरकार / जिल्हा प्रशासनाला राज्य एनसीसी संचालनालयामार्फत विनंती पाठवावी लागते. त्याचे तपशील एनसीसी संचालनालय / गट मुख्यालय / युनिट स्तरावर राज्य सरकार / स्थानिक नागरी प्राधिकरणाशी समन्वयित केले जातील. कॅडेट्सला ड्युटीवर तैनात करण्यापूर्वी त्याला स्थानिक पातळीवरील माहिती आणि गरजांची माहिती असणे गरजेचे आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एनसीसी ही देशातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना आहे आणि विविध सामाजिक सेवा आणि समुदाय विकास उपक्रम राबवित असते. आपल्या स्थापनेपासूनच पूर, चक्रीवादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींमध्ये एनसीसी कॅडेट्स राष्ट्रीय सेवेत त्यांचे योगदान देत आले आहेत..