पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे यांची बहुमताने निवड झाली. त्या शहराच्या 26 व्या तर सातव्या महिला महापौर झाल्या आहेत. त्या सांगवीचे प्रतिनिधित्व करत असून त्यांना 81 मते पडली. तर, राष्ट्रवादीच्या स्वाती उर्फ माई काटे यांचा पराभव झाला. त्यांना 41 मते पडली. ढोरे 40 मतांनी विजयी झाल्या. उपमहापौरपदी भाजपचे तुषार हिंगे बिनविरोध निवडून आले. दरम्यान, अपक्षांनी भाजपला मतदान केले. शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मतदान केले. तर, निलेश बारणे, प्रमोद कुटे गैरहजर राहिले. मनसेचे सचिन चिखले आणि अपक्ष नवनाथ जगताप देखील गैरहजर राहिले.
महापौर आणि उपमहापौरपदाच्या रिक्त जागेसाठी आज निवडणूक घेण्यात आली. सत्ताधारी भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे या पक्षाच्या माई ढोरे यांची महापौरपदी आणि तुषार हिंगे यांची उपमहापौरपदी निवड होणार असल्याचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीच स्पष्ट झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनुक्रमे महापौर- उपमहापौरपदासाठी माई काटे आणि राजू बनसोडे यांनी अर्ज दाखल केले होते. माई काटे यांनी माघार घ्यावी, यासाठी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी प्रयत्न केले. परंतु, ते निष्फळ ठरले. त्यामुळे महापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांनी कामकाज पाहिले.
सकाळी अकरा वाजता निवडणुकीला सुरूवात झाली. त्यांनी महापौरपदाच्या अर्जांची छाननी केली. माघारीसाठी 15 मिनिटांचा वेळ दिला. परंतु, माई काटे यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे महापौरपदासाठी मतदान घेण्यात आले. माई ढोरे 40 मतांनी ढोरे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.
त्यानंतर दुपारी बारा वाजता उपमहापौरपदासाठी निवडणूक झाली. अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांची वेळ देण्यात आली. राष्ट्रवादीचे राजू बनसोडे यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपने विनंती केली. विनंतीला मान देत बनसोडे यांनी माघार घेतली. त्यामुळे हिंगे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
निवडीनंतर भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नवनिर्वाचित महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे यांचे अभिनंदन केले.