काळेवाडी : केंद्र सरकारने पेट्रोल-डीझेलच्या किमतीसह गॅस सिलेंडर व अन्नधान्यांचे भावही गगनाला भिडवले आहेत. तर शिक्षण गरीबांच्या आवाक्याबाहेर गेले असून महागाईने परिसीमा गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते तथा रॉयल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष रवि नांगरे यांनी येथे केले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महागाईच्या विरोधात “हाहा:कार” जनजागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानिमित्त पेट्रोल-डिझेल, सिलेंडर तसेच अन्नधान्यांचे भाव कमी व्हावे. यासाठी काळेवाडी परिसरात पदयात्रा घेऊन जनजागृती करण्यात आली. त्यावेळी रवि नांगरे यांनी आपल्या प्रखर भाषणात सर्वसामान्यांचा आवाज बनून त्यांच्या मागण्यांना वाचा फोडली.
त्यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष व कामगार नेते डॉ. कैलास कदम, काँग्रेस पर्यावरण विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, अॅड. सोपान माने, माजी महापौर कवीचंद भाट, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, अल्पसंख्यांक प्रदेश सदस्य राजेंद्र सिंग वालिया, महिला नेत्या छाया देसले, सेवादलाचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, एनएसयूआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माउली मलशेट्टी, युनुस आतार, सज्जी वर्की व किरण नढे, वसीम इनामदार, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, प्रकाश नांगरे, अजय काटे, आनंद काटे, पंकज पाटोळे, अशोक गायकवाड, नरेंद्र नांगरे, प्रथम नांगरे, ख्रिश्चन एकता मंच जिल्हाध्यक्ष प्रकाश पठारे, काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष गणेश नांगरे, प्रतीक साळवी, पास्टर निर्मळ साबळे, फादर सालोमन भंडारी, आशा नांगरे, सामाजिक कार्यकर्त्या गीता यादव, राधा काटे, हिरा साळवे, महेंद्र सोनवले यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने या हाहाकार पदयात्रेत सहभागी झाले होते.
युवा नेते रवि नांगरे म्हणाले की, “कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून उद्योगधंदे बंद पडले आहेत. असे असताना इंधन दरवाढ दररोज होताना दिसत आहे. घरगुती गॅस हजार रुपयांच्या घरात पोहचला आहे. डाळी, खाद्यतेल अशा दैनंदिन अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला असून असहाय्य झाला आहे. मात्र, काँग्रेस पक्ष त्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभा असून या निर्दयी सरकारच्या विरोधात मैदानात उतरला आहे. त्यामुळे सर्वांनी एक होणे गरजेचे आहे.” असे आवाहन नांगरे यांनी नागरिकांना केले.
रवि नांगरे पुढे म्हणाले की, “मोदी सरकार अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून २०१४ मध्ये सत्तेवर आले. मात्र, काँग्रेसने उभारलेल्या सरकारी मालमत्ता विकण्याच्या सपाटा त्यांनी लावला असून शासकीय संस्थांचे आता खासगीकरण केले जात आहे. भाजपच्या याच नैतिकतेचा वारसा पिंपरी चिंचवड शहरात जपताना भाजपवाले दिसत असून नागरिकांच्या कररूपी पैशावर सत्ताधारी डाका टाकत आहेत. नागरिकांनी दिलेल्या कराच्या बदल्यात त्यांना चांगले रस्ते, नियमित पाणी, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा पुरविणे गरजेचे आहे. मात्र, नगरसेवक, अधिकारी व ठेकेदार महापालिका तिजोरीची लुट करून आपल्या तिजोऱ्या भरत आहेत. जनता आता जागृत झाली असून लवकरच त्यांना घरचा रस्ता दाखवणार, यात शंका नाही.”