लोकमराठी न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या स्थितीत सर्व अत्यावश्यक सेवा कोरोनाविरोधात एखाद्या योद्याप्रमाणे लढत आहेत. इतर सर्वाना सुरक्षा कवच आहे. सरकार काळजी घेत आहे. मात्र, यातून लोकशाहीचा चौथा स्तंभ दुर्लक्षित राहिलाय. शासनाने कामगार हिसाठी अध्यादेश काढून निर्देश जारी केलेत. तरीही प्रसारमाध्यमकर्मी पुरेसे सुरक्षित नाहीत. काही पत्रकारांना या विषाणूची बाधा झाल्याच्या बातम्या पसरू लागताच उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सक्रीय पत्रकारांची कोविड-१९ चाचणी करण्याची मागणी केली आहे. पण ही तपासणी पुरेशी नाही. यासोबत सर्व प्रसारमाध्यम व्यवस्थापन मालकांना खडबडून जागे करण्याची आणि जे मालक व व्यवस्थापन, वरिष्ठ माध्यम कर्मचारींच्या सुरक्षेत हयगय करत असतील आणि बातम्यांसाठी चुकीचा आग्रह धरत असतील अशांवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी एनयुजे महाराष्ट्रने केली आहे.
याबाबत अध्यक्ष शीतल करदेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात पुढीलप्रमाणे भूमिका मांडली आहे.
मालक, व्यवस्थापनाला संपादकांना हवेत झिरो ग्राऊंड रिपोर्ट, ऑफिसला येऊ नका पण फिल्डवर रहा, वॉक थ्रु करा, पण पुरेसे सुरक्षा कवच माध्यमकर्मींना नाही. रेड झोन असलेल्या ठिकाणीही पत्रकार बूम घेऊन बातमी देताहेत.
वर्क फ्रॉम होम म्हणजे काय तर
वर्क फ्रॉम होम म्हणजे काय तर पत्रकार विडियो जर्नालिस्टस, गाडी चालक आणि इतरांना फिल्डवर राहून बातम्या देणे. परत ऑफिसला यायचं नाही, कारण ऑफिसवाले सुरक्षित. पण ऑफिसला डेस्कवर काम करणारेही तसे सुरक्षित नाहीत. ट्रेन बंद, इतर प्रवास साधनं बंद, मग पुरेशा गाड्या या वृत्तवाहिन्यांनी देणे आवश्यक आहे.
काही वृत्तपत्रांचे लाईव्ह पेपर सुरु आहेत, डिजिटल सुरु आहेत. पत्रकारांसाठी कोणती सुरक्षा व्यवस्था? कोणते सुरक्षा कवच आहे? जर याच योद्ध्याची किंमत होत नसेल आणि मालक वर्ग बातमी दिली नाही तर सुट्टी होईल, गैरहजेरीची धमकी देत असेल तर, कायदाच वेठिस धरत असतील तर या मिडिया हाऊसेसचे मालक व व्यवस्थापनांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.
डोक्यावर पडलेले संपादक?
दोषी हे सगळे मोठ्या पदावरचे लोक आणि मालक आहेत. एका मराठी चॅनलच्या डोक्यावर पडलेल्या संपादकाने ताज्या अपडेट दिले पाहिजे आणि वॉक थ्रु केले नाहीत तर रजा म्हणून नोंद होईल. अशी पत्रकारांना धमकी दिलीय. आणि पत्रकारांना सुरक्षा, वाहन सुविधा याचं काय? तर उत्तर शून्य. हे कोण समजतात स्वतःला? देव की करोनाचे पिताश्री? कशासाठी घाबरवतात हे? कोणी लक्ष देणार की नाही? केवळ जीआर काढून कोविड-१९ चाचणी करुन काम होणार नाही, तर हा संसर्ग होउ नये, म्हणून प्रत्येक माध्यमकर्मीला पुरेशी सुरक्षा देणे महत्वाचे आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्य लक्षात घेऊन हे काम तातडीने करावे.