- शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले आयोजन
प्रतिनिधी, २४ सप्टेंबर २०२३ : पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत आकुर्डी येथील वर्षा कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा, यासाठी गणेशोत्सवाचे औचित्य साधत शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या वर्षा कदम यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अप्रतिम थीम उभारले होते. त्याचबरोबर काळेवाडी येथील पूनम गोरे यांनी स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक पटकावले. त्यांनी नुकताच महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या थीमवर सजावट केली होती. स्पर्धेचे तिसरे बक्षीस रहाटणी येथील गीतांजली कुंभार पटकावले. या तिघांनाही आयोजकांच्या वतीने रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र बक्षीस स्वरूपात देण्यात आले.
दरम्यान, स्पर्धेत चौथा क्रमांक खराळवाडी येथील कलावती फडतरे यांनी तर पाचवा क्रमांक काळेवाडी येथीलच सुरेखा कोकणे यांनी पटकावला. त्याचबरोबर आयोजकांनी २० सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. या सर्व विजेत्यांना आयोजकांच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात आले.
आयोजक चंद्रशेखर जाधव यांनी स्पर्धकांच्या घरी जाऊन त्यांना बक्षीस वितरण केले. याप्रसंगी युवक जिल्हा शहर अध्यक्ष कौस्तुभ नवले, प्रदेश सचिव गौरव चौधरी, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मृणालिनी मोरे यांनी काम पाहिले.
यावेळी सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करताना आयोजक चंद्रशेखर जाधव म्हणाले की, महाराष्ट्राची सर्वसमावेशक संस्कृती आणि दैदिप्यमान वारसा जपण्याचे बहुमूल्य काम गौरी गणपती या सणाने केले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही महिलांच्या सुप्त गुणांना बाहेर काढुन त्यांचा सन्मान करु शकलो, याचा आम्हाला अभिमान आहे. दरवर्षी सजावट तर होतेच परंतु यावेळेस स्पर्धेमुळे महिला भगिनींचा उत्साह द्विगुणित झाला आहे. सर्व महिलांनी गौरी गणपतीच्या आकर्षक व सामाजिक सांस्कृतिक परंपरेचे दर्शन, ग्रामीण जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या, पर्यावरण पूरक व ऐतिहासिक बरोबरच आजच्या काळातील जीवनशैलीचे चित्र या सजावटीच्या माध्यमातून उभारले होते, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.