कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नवीन आदेशानुसार पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले आणि सहायक पीठासीन अधिकारी गोविंद जाधव यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता १५ प्रभागासाठी पुन्हा नव्याने आरक्षण सोडत पार पाडली. यामध्ये तीन प्रभागात बदल घडला असून बाकी ठिकाणी जैसे थे परिस्थिती राहिली आहे.
नवीन आदेशानुसार कर्जत नगरपंचायतीच्या प्रभागासाठी पीठासीन अधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत नगरपंचायतीच्या १७ पैकी १५ प्रभागासाठी सोमवारी राजकीय पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत संपन्न झाली. प्रभाग क्रमांक १५ आणि १६ अनुसूचित जातीसाठी राखीव असून उर्वरित १५ प्रभागासाठी शुभ्रा श्रीकांत यादव, प्रणाली दीपक सुतार आणि राजवीर शिवानंद पोटरे या लहान मुलांकडून उपस्थितासमोर आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये प्रभाग क्रमांक २ जोगेश्वरवाडी भागात नामाप्र व्यक्तीच्या जागी सर्वसाधारण स्त्री , प्रभाग क्रमांक ७ बुवासाहेब नगर सर्वसाधारण व्यक्तीच्या जागी नामाप्र व्यक्ती तर प्रभाग क्रमांक ११ याठिकाणी नामाप्र स्त्रीच्या जागी सर्वसाधारण स्त्री असे नवीन आरक्षण पडले गेले. उर्वरित ठिकाणी काडीमात्र बदल घडला त्या जागा कायम राहिल्या आहेत. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीसाठी इच्छुक असणाऱ्यामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
कर्जत नगरपंचायत आरक्षण सोडत खालीलप्रमाणे :
प्रभाग २०२० २०२१
प्रभाग क्रमांक १(गायकरवाडी)- नामाप्र स्त्री – नामाप्र स्त्री,
प्रभाग क्रमांक २(जोगेश्वरवाडी) – नामाप्र व्यक्ती – सर्वसाधारण स्त्री,
प्रभाग क्रमांक ३(ढेरेमळा) – नामाप्र स्त्री – नामाप्र स्त्री
प्रभाग क्रमांक ४(माळेगल्ली) – सर्वसाधारण स्त्री – सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्रमांक ५(पोस्ट ऑफिस)- नामाप्र पुरुष – नामाप्र सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६(याशीननगर)- सर्वसाधारण व्यक्ती – सर्वसाधारण व्यक्ती
प्रभाग क्रमांक ७(बुवासाहेब नगर)- सर्वसाधारण पुरुष – नामाप्र
प्रभाग क्रमांक ८(शाहूनगर) – सर्वसाधारण व्यक्ती – सर्वसाधारण व्यक्ती
प्रभाग क्रमांक ९(समर्थनगर) – सर्वसाधारण स्त्री – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १०(बेलेकर कॉलनी) – सर्वसाधारण स्त्री – सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्रमांक ११(बर्गेवाडी)- नामाप्र स्त्री – सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्रमांक १२(शहाजीनगर)- सर्वसाधारण व्यक्ती – सर्वसाधारण व्यक्ती
प्रभाग क्रमांक १३(गोदड महाराज गल्ली) – सर्वसाधारण व्यक्ती – सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्रमांक १४(सोनारगल्ली) – सर्वसाधारण स्त्री – सर्वसाधारण स्त्री,
प्रभाग क्रमांक १५(भवानीनगर)- अनुसूचित जाती पुरुष
प्रभाग क्रमांक १६(आक्काबाईनगर) – अनुसूचित जाती स्त्री
प्रभाग क्रमांक १७(भांडेवाडी) – सर्वसाधारण स्त्री – सर्वसाधारण व्यक्ती
पाच वर्षात कर्जत नगरपंचायतीने तीन पीठासीन अधिकारी पाहिले.
कर्जत नगरपंचायतीची स्थापना २०१५ साली झाली असून आजमितीस प्रभागनिहाय आरक्षण तीन वेगवेगळ्या पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी पार पाडल्या आहेत. पहिल्या वेळेस प्रभागनिहाय आरक्षण सोडत तत्कालीन प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पार पाडली. त्यानंतर मागील वर्षी २०२० साली प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी तर आज नूतन प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रभागनिहाय आरक्षण सोडत संपन्न झाली. कर्जत नगरपंचायतीच्या पहिल्याच पंचवार्षिकमध्ये तब्बल तीन प्रांताधिकारी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.