
पिंपरी, दि ११ (प्रतिनिधी) : दोन कार भाड्याने घेऊन त्या परत न देता तसेच भाड्याचे पैसे न देता एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी येथे ही घटना घडली.
सुमीत सुनील कवडे (वय २८, रा. कोरेगाव पार्क, पुणे), ओंकार शशिकांत ढावरे (वय ३२, रा. यमुनानगर, निगडी), फयाज फक्रुद्दीन शेख (वय ३९, रा. विद्यानगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी रोहित महादेव गिरी (वय २८, रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी सुमीत, ओंकार आणि फिर्यादी यांच्यामध्ये एका मोटारीला दरमहा ७३ हजार रुपये; तर दुसऱ्या मोटारीला दरमहा ४८ हजार ६०० रुपये भाडे देण्याचे ठरले. फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी आगाऊ रक्कमही दिली. त्यानंतर रोहित यांच्या संमतीशिवाय एक मोटार फयाज शेख याला परस्पर विक्री करण्यासाठी दिली; तर दुसरी मोटार आणि तिचे पैसे रोहित यांना न देता त्यांची फसवणूक केली.