- सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी
पिंपरी: निगडी महाराणा प्रताप मार्ग ते यमुनानगर स्वानंद डेअरी पर्यंत असणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण हे एका महिन्यापूर्वीच करण्यात आले होते.सदर डांबरीकरण केलेल्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या ठिकाणी जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याने भरलेली अनामत रक्कम जप्त करून कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत दिपक खैरनार यांनी म्हटले आहे की, निगडी महाराणा प्रताप मार्ग ते यमुनानगर स्वानंद डेअरी पर्यंतच्या रस्त्याचे एका महिन्यापूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते. परंतू पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले आहेत. त्यातच या रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.खडीवर पुरेशा प्रमाणात डांबर ओतले नसल्याने सर्वत्र खडी पसरली आहे. ठेकेदाराने अगोदरचा डांबरी रस्ता न कोरता, त्यावर डांबर न टाकता जागोजागी पडलेले खड्डे न भरता कोणत्याही प्रकारे मंजूर नसलेल्या आकाराची दगडी खडी टाकून निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. यावरून सदर रस्त्याची गुणवत्ता किती निकृष्ट दर्जाची असेल, हे कळून येते. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. अनेक नागरिक जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करीत आहेत. मात्र, पावसाचा जोर वाढला व रस्त्यावरून पाणी वाहायला लागले, तर रात्री-अपरात्री वाहून गेलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकून कडक कारवाई करण्यात यावी व सदर रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.