पिंपरी चिंचवड : चिखली मध्ये एका मित्राने त्याच्या साथीदारासोबत मिळून मित्राला गोळ्या घालून ठार मारले. ही घटना सोमवारी (दि. 22) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली. या खुनाचे कारण अगदी क्षुल्लक आहे. मित्राची प्रतिष्ठा वाढू लागल्याने हा खून झाल्याचे समोर आले आहे.
कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय 21, रा. महादेवनगर, चिखलीगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे मामा राजेंद्र कैलास कार्ले (वय 38, रा. चांदूस, ता. खेड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ उर्फ सोन्या पानसरे, सिद्धार्थ कांबळे (दोघे रा. फलकेवस्ती, मोईगाव, ता. खेड) आणि त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी नवरात्रीच्या उत्सवात विकास साने यांनी पाटीलनगर चिखली येथील मैदानावर दांडिया कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात कृष्णा आणि आरोपी यांचे भांडण झाले होते. त्यानंतर कृष्णा याची चिखली परिसरात प्रतिष्ठा वाढू लागली. याचा राग मनात धरून आरोपींनी कट रचून कृष्णाचा खुन करण्यात आला.