Lok Marathi News Network
पिंपरी चिंचवड : शहरामध्ये मागील अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवकांनी स्वतः वारंवार मागणी करूनही कचरा प्रश्न मार्गी लावण्यात महापालिकेला अपयश आले आहे. काहीही असले तरी आरोग्यप्रमुख व आयुक्त श्रावण हर्डीकर हेच या समस्येला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी येत्या शनिवारपर्यंत (दि. १३) तातडीने तोडगा काढावा. अन्यथा अपना वतन संघटनेच्या वतीने रविवार (दि. १४) सकाळी १० वाजता आयुक्त हर्डीकर यांच्या बंगल्यावर डस्टबिन आंदोलन करण्यात येईल. असा इशारा अपना वतनचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी दिला आहे.
१ जुलै पासून आरोग्य विभागाने कचरा संकलन व वाहनाचे काम बीव्हीजी इंडिया व ए. जी इन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपन्यांना दिले आहे. त्यापोटी त्यांना लाखो रुपये देण्यात येणार आहेत. परंतु आठवडा उलटून गेला तरी या दोन्ही कंपन्यांना शहरातील कचरा समस्या मार्गी लावता आली नाही. काही लोकप्रतिनिधींनी तर थेट आरोप केला आहे कि, टक्केवारीच्या कारणावरून कचरा निविदा प्रक्रिया लांबवली गेली. राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी सुद्धा कचरा फेकून आंदोलन केले. त्यामुळे कचरा प्रश्न योग्य उपाययोजना करून मार्गी लावणे विरोधी पक्षातील व सत्तधारी नगरसेवकांचे सुद्धा हातात नाही तर मग नेमक्या कुणाच्या हातात आहे? असा प्रश्न पडतो. असे शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.