HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये नवलेखक कार्यशाळा संपन्न

HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये नवलेखक कार्यशाळा संपन्न 

हडपसर (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, महिला सक्षमीकरण समिती व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय नवलेखक कार्यशाळा रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे येथे संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.दिनेश पवार व प्रा.किशोर मुठेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे साहेब यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.दिनेश पवार म्हणाले की, आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी साहित्याची निर्मिती केली जाते. वाचन लेखनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करता येते. आजच्या तरुणांनी वाऱ्याच्या वेगाने ग्रंथ वाचन आणि लेखन केले पाहिजे. ग्रंथातील शब्दांमध्ये जग बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळे आजच्या तरुणांनी हाती मोबाईल घेण्याऐवजी पुस्तक घ्यावे असे मत प्रा.दिनेश पवार यांनी व्यक्त केले.

प्रा.किशोर मुठेकर म्हणाले की, मराठी भाषेला एक दीर्घ परंपरा आहे. सर्व संतांनी आपला पूर्व इतिहास ग्रंथांच्या माध्यमातून सांगितला आहे. ग्रंथांमधून तत्कालीन समाजाचे आणि संस्कृतीचे दर्शन घडते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रंथांच्या माध्यमातून आपला पूर्व इतिहास जाणून घेवून नवीन इतिहास लिहायला पाहिजे. असे मत प्रा.किशोर मुठेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठी विभागाचे विभागप्रमुख प्रा. राधाकिसन मुठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळाचे चेअरमन डॉ.अतुल चौरे यांनी तर पाहुण्यांचा परिचय महिला सक्षमीकरण समिती चेअरमन डॉ.ज्योती किरवे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार डॉ.संघर्ष गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुशांत मोकळ यांनी केले. कार्यक्रमासाठी क्रीडा विभागप्रमुख प्रा.दत्ता वासावे, डॉ.संदीप वाकडे, प्रा.शुभम तांगडे, प्रा.धीरेंद्र गायकवाड, डॉ.नम्रता कदम, डॉ.शितल कोरडे व बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.