केंद्र सरकारच्या चुकीच्या नीतीमुळे महागाईचा भस्मासुर पोसला जातोय – कविता अल्हाट

केंद्र सरकारच्या चुकीच्या नीतीमुळे महागाईचा भस्मासुर पोसला जातोय - कविता अल्हाट

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी, ता. ७ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने वाढत्या महागाईच्या मुद्दावरून केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता आल्हाट यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कविता आल्हाट म्हणाल्या की, “काँग्रेस प्रणित संयुक्त आघाडीच्या सरकारच्या काळात ४५० रुपये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत होती. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून सामान्य जनतेच्या जीवनावश्यक वस्तू सह घरगुती गॅसची सतत दरवाढ होत आहे. आज घरगुती गॅस सिलिंडर १०५० रु झाला आहे. कोव्हीड काळात नोकऱ्या गेल्या, छोटे मोठे व्यवसाय बुडाले, सर्वसामान्य आणि बहुतांश मध्यम वर्गाची आर्थिक स्थिती खराब झालेली आहे. सरकारने सामान्य जनतेला आर्थिक दिलासा द्यायला हवा होता. मात्र सरकार दरवाढ, करवाढ करत आहे. आता सरकार अन्नधान्यावर जीएसटी लावणार आहे. इंधन, अन्नधान्य, पेट्रोल, सीएनजीसह दैनंदिन गरजेच्या वस्तूवर करवाढ करून सरकार सर्वसामान्य आणि मध्यमवर्गावर अन्याय करत आहे. केंद्रसरकारने सबसिडी देऊन महागाई रोखावी,” असे आवाहन कविता आल्हाट यांनी केले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सरकारच्या हुकूमशाही कारभारावर टीका केली. ते म्हणाले की, लोकशाही मार्गाने सत्तेत आलेले केंद्र सरकार हुकूमशाही कारभार करत आहे. महाराष्ट्रात केंद्रीय संस्थांचा वापर करून त्यांनी आमदार फोडले आहेत. या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी यापुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या वेळी सजग राहून मतदान केले पाहिजे. निरंतर वाढत असलेली महागाई आणि सर्वसामान्य जनतेची होरपळ करणाऱ्या महागाई विरोधात राज्यभर निदर्शने आंदोलने होत आहेत. जनतेने भाजपच्या विरोधातील आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अजित गव्हाणे यांनी केले.

या आंदोलनात माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, कार्याध्यक्ष उज्वला ढोरे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष रमा ओव्हाळ, पुनम वाघ, महिला मुख्य संघटिका मीरा कदम, समिता गोरे, सुनिता लांडे, माजी नगरसेविका माया बारणे, ज्योती मधुरकर, सारिका हरगुडे, ओबीसी सेल अध्यक्ष निर्मला माने, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, उपाध्यक्ष शिरीष साठे, अर्बन सेना अध्यक्ष दत्तात्रय जगताप, राजेश हरगुडे, अशोक मगर, काशिनाथ जगताप, मंगेश खंडागळे, भूपेंद्र तामचिकर, सन्नी ओव्हाळ, किरण नवले, केशव वाखारे, संतोष माळी, अनिल भोसले आदी उपस्थित होते.