‘व्हिज्युअल आर्ट्स’ व साहित्य यांच्यात परस्पर संबंध – भास्कर हांडे

'व्हिज्युअल आर्ट्स' व साहित्य यांच्यात परस्पर संबंध - भास्कर हांडे
  • डाॅ. आंबेडकर महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रमाला प्रारंभ

औंध, ता.१८ (प्रतिनिधी) : “व्हिज्युअल आर्ट्स’ आणि साहित्य यांच्यात परस्पर संबंध आहे, ज्याचा अभ्यास होणे ही काळाची गरज आहे. आपल्याकडील संत साहित्य हेही याचेच उत्तम उदाहरण आहे,” असे मत आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्र-शिल्पकार भास्कर हांडे यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या येथील, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाविद्यालयात श्री.हांडे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘व्हिज्युअल आर्ट्स’मधील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य.डाॅ.अरूण आंधळे, डाॅ.सविता पाटील, डाॅ.प्रभंजन चव्हाण, प्रा.बद्रीनाथ ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. हांडे पुढे बोलताना म्हणाले, “भारतीय परंपरेत चौसष्ठ कला आहेत. या सर्व कला संगीत, नृत्य, चित्र, मुद्रकला, अभियांत्रिकी कला, गणितीय कला अशा अनेक विषयांतून अभ्यासता येतात. अशा अनेक विद्याशाखांची माहिती या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पूर्वी वरील सर्व कलागुण छंद म्हणून जोपासले जात होते. परंतु, आता अशा कलांमधून रोजगार निर्मिती देखील होते व अनेक क्षेत्रांमध्ये रोजगारांच्या संधी देखील निर्माण होतात. त्यामुळेच आधुनिक काळामध्ये या अभ्यासक्रमाचे महत्व अधोरेखित होते. सदर अभ्यासक्रम हा एकूण १२० तासांचा असून, तो ४ पेपरमध्ये विभागला आहे. ज्यामध्ये सिद्धांत व प्रात्याक्षिक या दोन्हींचा अंतर्भाव आहे. कोणत्याही शाखेतील १२ वी.पास व्यक्ती या अभ्सासक्रमात प्रवेश घेण्यास पात्र असेल.”

याप्रसंगी प्राचार्य.डाॅ. आंधळे म्हणाले की, “श्री.भास्कर हांडे हे जागतिक किर्तीचे नामांकित चित्रकार, शिल्पकार, तत्वज्ञ कवी आणि लेखक आहेत. त्यांचा वारकरी संत साहित्यावर विशेष अभ्यास आहे. संत साहित्य हे जागतिक पातळीवरती उदार उचित साहित्य म्हणून पाहिले जाते असे त्यांचे मत आहे. त्यांचे संत तुकाराम यांच्या अभंगावरील ‘तुझे रूप माझे’ देणे हा शिल्प चित्रकला संग्रह देश विदेशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे सदर अभ्यासक्रम हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणे आणि त्यासाठी त्यांनी आमच्या महाविद्यालयाची निवड करणे, ही नक्कीच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ‘व्हिज्युअल आर्ट्स’ ही उच्चभ्रूंची समजली जाणारी कला सामन्या कुटूंबातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचा आमचा मानस आहे.”

सदर पत्रकार परिषदेचे सुत्रसंचालन प्रा.चंद्रकांत बोरुडे यांनी केले तर, आभार डाॅ. धनंजय भिसे यांनी मानले. तसेच या पत्रकार परिषदेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील ‘फोटोजर्नलिझम’ या कोर्सच्या विद्यार्थ्यांसह डाॅ.बंडोपंत कांबळे, डाॅ.बाळासाहेब कल्हापूरे, प्रा.सायली गोसावी, अनिल मते, रोहन कांबळे, बाळू शितोळे यांनी परिश्रम घेतले.