हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजच्या मराठी विभागातील डॉ. अतुल चौरे यांना “विकसनशील अर्थव्यवस्थांमधील मोठ्या कॉर्पोरेशन्सच्या आर्थिक कामगिरीवर कॉर्पोरेट गव्हर्नन्स धोरणे आणि पद्धतींचा प्रभाव” या विषयावरती पेटेंट मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल पश्चिम विभागाचे चेअरमन अँड. राम कांडगे, डॉ. राजेंद्र शर्मा, प्राचार्य डॉ.एन.एस. गायकवाड, प्राचार्य डॉ.अरुण आंधळे यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. अतुल चौरे यांची सन 2012 साली दौलतराव जाधव तुरूंग अधिकारी प्रशिक्षण केंद्र, येरवडा या ठिकाणी जेलर पदावर नियुक्ती झाली होती. सध्या ते रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या अगोदरही त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी, महात्मा फुले कॉलेज पनवेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज औंध या ठिकाणी अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली असून ४ विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत आहेत. कॉलेज सीड मनी अनुदानातून मायनर रिसर्च प्रोजेक्ट “मराठी साहित्यातून व्यक्त झालेल्या धनगर समाजाचे चित्रण” या विषयावर मंजूर झाला आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेतून ३५ शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ३२ शोधनिबंध सादर केले आहेत. संपादित ग्रंथात २५ शोधनिबंधाचे लेखन केले आहे. त्यांनी ८ ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यामध्ये प्रकाशवाटा: एक आकलन, भाषिक कौशल्य विकास, आधुनिक साहित्यप्रकार कादंबरी: रारंग ढांग, मराठीतील वैचारिक साहित्य आणि साहित्याचा सामाजिकदृष्टीने अभ्यास, साहित्यविचार आणि साहित्यसमीक्षा, अर्वाचीन मराठी वाड्मयाचा इतिहास (इ.स.१८१८ ते २०२०), मध्ययुगीन मराठी वाड्मयाचा स्थूल इतिहास: प्रारंभ ते १६००, आधुनिक मराठी साहित्य: प्रकाशवाटा आणि मध्ययुगीन मराठी साहित्य: निवडक मध्ययुगीन गद्य, पद्य इतर ग्रंथलेखन केले आहे. विविध महाविद्यालयांमध्ये
तज्ञ मार्गदर्शक म्हणून १५ पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक म्हणून काम पाहिले आहे.महाविद्यालयीन स्तरावरील विविध समित्यांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आहे. विद्यापीठ स्तरावरील प्राध्यापक निवड समितीवर विषयतज्ञ म्हणूनही कार्य केले आहे. त्यांना अखिल भारतीय साहित्य परिषद, वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषद शाखा बेलवंडी यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविले आहे. तसेच महात्मा फुले आर्ट्स, सायन्स अॅन्ड कॉमर्स कॉलेज, पनवेल यांनी सलग तीन वर्ष Best Performance Award (सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दलचा पुरस्कार) देवून गौरविले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे, मराठी विभागप्रमुख डॉ.राजेंद्र ठाकरे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.