वारकरी लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा

वारकरी लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा
  • काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पिंपरी : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानावेळी पोलीसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला असून हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली किरण नढे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली सायली नढे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी स्वाती शिंदे, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा निर्मला खैरे, शबाना शेख, महिला शहर उपाध्यक्षा आशा भोसले, रंजना सौदेकर आदी उपस्थित होत्या.

Pimpri Chinchwad Police Commissioner यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगद्गुरू संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) व संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोहळा दरवर्षी होत असतो. देहूतून संत तुकाराम महाराज व आळंदी येथीून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसोबत हजारो वारकरी पंढरपूर येथे विठुरायाच्या भेटीला जात असतात. ही सुमारे शंभर वर्षांची वारकरी परंपरा आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या संख्येने वारकरी गोळा होतात.

मात्र, आळंदी येथे पोलीसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. ही खुप निंदनीय घटना असून वर्षानुवर्षे चालणाऱ्या पालखी सोहळ्याला हे लागलेले गालबोट आहे. दंगली घडवणाऱ्या गुन्हेगारांप्रमाणे वारकऱ्यांना पोलीसांनी वागणूक दिली. यामुळे वारकरी संप्रदायात नाराजी पसरली असून समाजप्रबोधनकार व बंधुभावाचा उपदेश देणारा वारकरी संप्रदाय दुखावला आहे. त्यामुळे आळंदीत झालेल्या प्रकरणीची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.