मुंबई दि ८ :विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या शरीर स्वास्थाला व सुरक्षिततेला धोका पोहोचू नये त्यासाठी कामगारांकडून ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करू नये,असे निर्देश सहकार व पणन मंत्री ना बाळासाहेब पाटील यांनी दिले.
आज मंत्रालयात सहकार व पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांना ५० किलो वजनाच्यावर भार वाहू न देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे,महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील,महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील पवार,सहायक निबंधक अहमदनगर शरीफ शेख ,सहायक निबंधक सोलापूर श्री.माने, एपीएमसी चे संचालक अशोक वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई उपसभापती धनंजय वाडकर, सचिव संदीप देशमुख, संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख, चंद्रकांत पाटील,माथाडी कामगार युनियनचे खजिनदार गुंगा पाटील,किराणा बाजार दुकाने मंडळाचे चेअरमन बाळासाहेब वाघ,व्यापारी राजीव मणिआर व कामगार व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पणन मंत्री श्री. पाटील म्हणाले, बाजार समित्यांमध्ये ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्या गोण्या व्यापाऱ्यांनी शेतमालाची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांकडून चढ-उतार करणे आरोग्यांच्या दृष्टीने घातक आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती माथाडी कामगारांकडून ५० किलो पेक्षा अधिक वजनाच्या गोण्यामधून मालाची चढ-उतार होणार नाही या बाबतची राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावी.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर राज्यातून येणारा माल असतो त्या त्या राज्याला सुध्दा ५० किलो पेक्षा अधिक गोण्या भरू नये अशा सूचना द्याव्यात आणि पणन व कामगार विभागाने राज्यातील सर्व बाजार समित्यांना कळवावे.त्याच बरोबर स्थानिक जिल्हा उपनिबंधक यांनी याबाबत अधिक जन जागृती करावी असंही सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.