पुणे : आम आदमी पार्टी युवा आघाडीचे महाराष्ट्र युवा अधिवेशन रविवारी (ता. ३१ जुलै) बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात होत आहे. या अधिवेशनाला आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार संजय सिंग (Sanjay Singh) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे ‘आप’ युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
खा. संजय सिंग यांच्याबरोबरच दिल्ली विधानसभेचे सर्वात तरुण आमदार कुलदीप कुमार व गोव्याचे आमदार वेंझी वेगस यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असणार आहे. या अधिवेशनामध्ये रोजगार, शिक्षण, आरोग्य, राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांचा सहभाग या काही प्रमुख विषयांवर चर्चा होणार असल्याचे युवा आघाडी उपाध्यक्ष व अधिवेशनाचे समन्वयक संदीप सोनवणे यांनी सांगितले.
खा. संजय सिंग यांचे आगमन सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन होणार असून ते 11:15 वाजता बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात पोहोचतील.
येणारी पुणे महापालिका निवडणूक तसेच राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होणार आहे. यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा युवा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.
यानिमित्ताने पक्षाचे राज्यातील नेतृत्व देखील पुण्यामध्ये दाखल होत आहे. शनिवारी राज्य समितीची बैठक शहरामध्ये होणार असून प्रदेश प्रभारी दीपक सिंगला, निवडणूक प्रभारी व गोव्याचे माजी मंत्री महादेव नाईक, प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांच्याबरोबरच पक्षाचे सर्वच नेते अधिवेशनात सहभागी होणार असल्याचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले. यावेळी युवा आघाडीचे प्रदेश प्रवक्ते उत्तम पाटील उपस्थित होते.