हडपसर, 23 सप्टेंबर 2024 (प्रतिनिधी) – एस. एम. जोशी कॉलेज व साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी व 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हडपसरचे लोकप्रिय आमदार व रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागीय चेअरमन चेतन (दादा) तुपे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा) तुपे व महाविद्यालय विकास समिती सदस्य अमर (आबा) तुपे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा, कर्मवीर संवादमाला, निबंध लेखन स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व पोस्टर प्रदर्शन इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारत सासणे म्हणाले की, बहुजन समाजातील लोकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. विविध जाती जमातीमधील विद्यार्थ्यांना एकत्र राहण्यासाठी वसतिगृहाची व्यवस्था करून बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था केली. हजारो वर्षापासून अंधकारात गुरफटलेल्या समाजाला शिक्षणाची नवी वाट दाखवून, माणूस म्हणून जगण्याची संधी प्राप्त करून दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक व सामाजिक क्रांती केली. त्याचप्रमाणे आजच्या शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये विवेक जागृतीचे कार्य करून सामाजिक व शैक्षणिक परिवर्तन करावे. असे मत भारत सासणे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर काकडे यांनी तर पाहुण्यांची ओळख उपप्राचार्य योजना निकम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य रोहिणी सुशीर यांनी केले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, प्राचार्य डी. जी. जाधव, प्राचार्य व्ही. एल. तुळजापुरे, मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर, मुख्याध्यापिका झिनत सय्यद उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.शिल्पा शितोळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो.डॉ.दिनकर मुरकुटे, प्रा.ऋषिकेश खोडदे, डॉ.निशा गोसावी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.अतुल चौरे, ज्युनिअर विभागप्रमुख प्रा.तृप्ती हंबीर व प्रा.गणेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नम्रता कदम व प्रा. नयना शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.