PIMPRI CHANCHWAD : उताऱ्यात नोंद लावण्यासाठी चार लाखांची लाच; मंडलाधिकारी अटकेत

PIMPRI CHANCHWAD : उताऱ्यात नोंद लावण्यासाठी चार लाखांची लाच; मंडलाधिकारी अटकेत

पिंपरी : बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या मंडलाधिकाऱ्याला विशेष न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Pune) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. ४) चिंचवड येथील मंडलाधिकारी कार्यालयात ही कारवाई केली.

सुरेंद्र साहेबराव जाधव (५६) असे अटक केलेल्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाल्हेकरवाडी येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने वाल्हेकरवाडी येथे सहा गुंठे जागा घेऊन बंगल्याचे बांधकाम केले होते. या बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर लाच ४ लाख ५० हजार रुपयांपर्यंत आली.

दरम्यान, मंगळवारी (दि. ४) मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी चार लाख रुपयांची रक्कम स्वीकारली. हे पैसे पार्किंगमध्ये ठेवण्यासाठी कारमध्ये जात असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी गाडीतून लाचेची रक्कम जप्त केली.