PIMPRI:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरू नये म्हणून पतीने रचला बनाव…

PIMPRI:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरू नये म्हणून पतीने रचला बनाव…

पिंपरी :- मुलीच्या मृत्यूला पत्नीला जबाबदार धरून पतीने तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे खरे कारण बाहेर येऊ नये, आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पतीने स्वतःच मृत पत्नीच्या नावाने खोटी चिठ्ठी लिहिल्याची घटना २५ फेब्रुवारीला पिंपळे सौदागर येथे उघडकीस आली.

हिमांशू दिनेश जैन (३५, रा. सौदागर) या संगणक अभियंता पतीवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या ३२ वर्षीय विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हिमांशू हा संगणक अभियंता असून आत्महत्या केलेली विवाहिता गृहिणी होती. हिमांशू याचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते, त्यावरून पती-पत्नीत सतत वाद होत होते. दरम्यान, त्यांच्या एक वर्षीच्या मुलीचे २७ फेब्रुवारी २०२४ रोजी आजारामुळे निधन झाले. त्यानंतर हिमांशूने पत्नीला मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार धरून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने आत्महत्या केली.

पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर येताच, आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये, म्हणून त्याने एक खोटी चिठ्ठी लिहून ठेवली आणि ती मृत पत्नीने लिहिल्याचा बनाव केला. या चिठ्ठीच्या आधारे आत्महत्येचे वेगळेच कारण पुढे आणण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांकडे फिर्याद दिल्याने या बनावाचा पर्दाफाश झाला.

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे चिठ्ठी, ती खरोखर पत्नीनेच लिहिली आहे की, पतीने? हे तपासण्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे चिठ्ठी पाठवण्यात येणार असल्याने सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बनसोडे यांनी सांगितले

Actions

Selected media actions