पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ नं मंगळवारी पुण्यात (Pune) सन्मानित करण्यात आलं. दिपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. (PM Modi awarded by Lokmanya Tilak National Award 2023)
सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते.
असे पुरस्काराचं स्वरुप
लोकमान्य टिळकांची ओळख असलेली पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि दैनिक केसरीचा पहिला अंक आणि प्रतिमा आणि १ लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. यातील १ लाखांची रक्कम पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार ‘नमामी गंगे’ या गंगा नदी स्वच्छतेच्या प्रकल्पासाठी देण्यात येण्यात आली.
मोदींना का दिला पुरस्कार?
PM मोदी यांची या पुरस्कारासाठी का निवड करण्यात याबाबत सांगताना दीपक टिळक म्हणाले, “लोकमान्यांनी यावेळी सर्व विश्वस्त चर्चेसाठी एकत्र आले तर आमच्यासमोर एकच नाव आलं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. कारण लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र, आधुनिक, बलाढ्य हिंदुस्थानचं स्वप्न पाहिलं होतं.
राष्ट्रीयत्व, हिंदुस्तानची पुरातन विद्या, वैभवशाली इतिहास, राष्ट्रप्रेम स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी अर्थकारण लोकमान्यांनी सांगितलं होतं. तेच सूत्र मोदींच्या लोककल्याणकारी बलाढ्य राष्ट्राच्या मागे आहे.
त्यातच आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, नवे तंत्रज्ञान, नवे शैक्षणिक धोरण हे त्यांच्या कार्यक्रमात आढळतात. म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे,” असं दीपक टिळक यांनी सांगितलं.