साहित्य सम्राटची श्रावण सहल काव्यसरींनी चिंब

साहित्य सम्राटची श्रावण सहल काव्यसरींनी चिंब

निगडी (लोकमराठी न्यूज) : साहित्य सम्राट पुणे संस्थेकडून माय मराठीच्या सेवेसाठी आणि संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले जातात. यावेळी संस्थेने सदाबहार सहपरिवार साहित्यिक श्रावण सहल या उपक्रमाचे आयोजन शहीद सुखदेव राजगुरू जन्मस्थान, शंभू महादेव डोंगर, चासकमान धरण आणि सॊमेश्वर मंदिर या ठिकाणी केले होते. दिवसभर साहित्यिकांनी निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त आनंद घेतला.

सर्वांनी यावेळी महान देशभक्त शहिद चंद्रशेखर आझाद यांच्या ११७ व्या जयंती निमित्ताने साहित्य सम्राटचे १७१वे कविसंमेलन जेष्ठ कवयित्री ऍड.संध्याताई गोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. मंचावर जेष्ठ गझलकार म. भा.चव्हाण. माजी जिल्हाधिकारी अशोक जाधव, राष्ट्रपती पुरस्कार विजेते सीताराम नरके, निवेदक जगदीप वनशिव आणि संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुस्तक बंद या चित्रपटातील सिताराम नरके लिखित गीताच्या ध्वनिफितीचे अनावरण करण्यात आले.

शहिद राजगुरू यांचे शौर्य आणि निसर्गाचे सौंदर्य कवी कवयित्रींच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. हे त्यांच्या बहारदार काव्यांतून ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित करताना दिसत होते. यावेळी स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि मणिपूर मधील घटनेचा निषेध काव्यातून मांडण्यात आला. साहित्यिकांनी पर्यावरण आणि सामाजिक जीवन यावर प्रबोधन करणारे साहित्य लिहून व कृतीतून साकारले पाहिजे असे विचार म.भा. चव्हाण यांनी व्यक्त केले.

कविसंमेलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने झाल्याने कार्यक्रम रायगडासम उंचीवर पोहोचला. कवी शांतीलाल ननावरे, सूर्यकांत नामुगडे, किशोर टिळेकर, ऋषिकांत भोसले, प्रल्हाद शिंदे, नानाभाऊ माळी, आशा शिंदे, मसूद पटेल, दत्तात्रय पवार, वेदांत पवार, कांचन मुन, कविता काळे, शुभांगी शिंदे, सुवर्णा जाधव, विद्या पवार, दत्तात्रय खंडाळे, रुपाली अवचरे, उमाकांत आदमाने, ऋचा कर्वे, बाळकृष्ण अमृतकर, अशोक शिंदे, बाळासाहेब गिरी, अलका जोगदंड, सीताराम नरके, अशोक जाधव, विनोद अष्टुळ, जगदीप वनशिव, म.भा.चव्हाण आणि संध्या गोळे यांनी आपल्या आशयघन कवितांनी काव्य रसिक योगिता रंदे, अर्चना अष्टुळ, उषा भरणे, सुनंदा अमृतकर, अमोल दौंडकर, सचिन कोळी आणि सर्व ग्रामस्थ यांची मने जिंकली. कविसंमेलनाचे प्रास्ताविक विनोद अष्टुळ, सूत्रसंचालन जगदीप वनशिव आणि आभार ऍड. उमाकांत आदमाने यांनी व्यक्त केले.