नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीला (भाजप) एका वर्षात तब्बल 700 कोटी रुपयांचा पार्टी फंड मिळाला आहे. ऑनलाईन पेमेंट आणि चेकच्या माध्यमातून सन 2018-19 या आर्थिक वर्षात भाजपला पक्षनिधी म्हणून विविध संस्था आणि व्यक्तींकडून 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यापैकी जवळपास निम्मी रक्कम ही टाटाच्या अधिपत्याखालील इलेक्ट्रोल ट्रस्टकडून देण्यात आला आहे. भाजपानेच याबाबतची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.
भाजप हा सध्या देशातील सर्वात मोठा पक्ष जगातील सर्वात मोठी पार्टी असल्याचा दावाही भाजपाकडून करण्यात येतो. त्यामुळेच, भाजपला मिळणारा निधीही कोट्यवधी रुपयांचा असतो. सन 2018-19 या आर्थिक वर्षात भाजपाला तब्बल 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. टाटा उद्योग समुहाशी संलग्नित इलेक्ट्रोल ट्रस्टकडून तब्बल 356 कोटी रुपयांचा निधी भाजपाला देण्यात आला आहे. तसेच, देशातील काही विश्वसनीय संस्थांकडूनही 54.25 कोटी रुपयांचा निधी भाजपाला मिळाला आहे.
देशातील या विश्वसनीय ट्रस्टमध्ये टॉप कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग आहे. त्यामध्ये भारती ग्रुप, हिरो मोटोकॉर्प, ज्युबिलंट फूडवर्क, ओरियंट सिमेंट, डीएलएफ, जेके टायर्स इत्यादी कंपन्यांचा सहभाग आहे. तसेच, विविध संस्था आणि व्यक्तींकडून ऑनलाईन व चेकद्वारे लहान-मोठ्या रकमेद्वारे पक्षाला निधी देण्यात आला आहे.