हडपसर (प्रतिनिधी ) : भारत हा सर्वधर्म समभाव जोपासनारा देश आहे. प्रत्येक रयत सेवकाने व विद्यार्थ्यांनी कर्मवीरांनी दिलेल्या मूल्यांचे जतन करण्याचा हा काळ आहे. रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस घडत आहे. हा माणूस जात-धर्म पंथाच्या पलीकडे जाणारा असावा. सर्व धर्म समभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडायला पाहिजे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर व कर्मवीर यांनी दाखवलेली वाट हीच प्रकाशाची वाट आहे. महापुरुषांना जाती धर्मात न बांधता आपण सर्व माणूस होण्याचा प्रयत्न करूया. जातीचा अंत झाला, तरच भारत देश महान होईल. भव्य दिव्य स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईला थोर महापुरुषांचे विचार समजावून सांगितले तरच संस्कारित पिढी निर्माण होईल. ही पिढी भारत देशाला बलवान करेल. आपण सर्वजन कर्मवीरांचा समतेचा व मानवतेचा विचार समाजात रुजवूया. असे विचार प्रमुख अतिथी ज्येष्ठ लेखक संपादक मा. संजय आवटे यांनी एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंतीप्रसंगी व्यक्त केले.
ते एस. एम. जोशी कॉलेज व रयत शिक्षण संस्थेचे साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कर्मवीर जयंतीप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी आमदार चेतन (दादा ) तुपे यांनी कर्मवीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडीचे सदस्य दिलीप (आबा ) तुपे म्हणाले की, आपण कर्मवीरांचे कार्यकर्ते आहोत. कर्मवीरांच्या संस्काराने सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस घडत आहे. ज्ञानदान करणारा रयत सेवक नवी पिढी घडविण्याचे कार्य करीत आहे. असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी केले. ते म्हणाले की, बहुजनांच्या उत्थानासाठी कर्मवीरांनी आयुष्यभर शैक्षणिक कार्य केले. महात्मा फुले यांचा विचार व वारसा कर्मवीरांनी पुढे चालवला. राजर्षी शाहू महाराज, सयाजीराजे गायकवाड व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या समारंभात प्रोफेसरपदी निवड झाल्याबद्दल डॉ. किशोर काकडे, डॉ. राजेंद्र ठाकरे व पेटंट मिळाल्याबद्दल डॉ.एकनाथ मुंडे, डॉ. शिल्पा शितोळे, डॉ. अतुल चौरे इत्यादींचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अमर (आबा) तुपे, आजीव सभासद लालासाहेब खलाटे, साधना शैक्षणिक संकुलाचे सर्व शाखाप्रमुख सौ. सुजाता कालेकर, झीनत सय्यद, सौ. रोहिणी सुशीर, सौ. लक्ष्मी आहेर, उपप्राचार्य योजना निकम, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप व सर्व शिक्षक, प्रशासकीय सेवेक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ. नम्रता मेस्त्री-कदम, डॉ. विश्वास देशमुख यांनी केले. तर आभार प्राचार्य सौ. सुजाता कालेकर यांनी मानले. सांस्कृतिक विभाग, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व ज्युनिअर विभागाने हा समारंभ यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.