महिलेच्या धाडसामुळे वाचला तरुणाचा जीव

महिलेच्या धाडसामुळे वाचला तरुणाचा जीव

पुणे (प्रतिनिधी) – रस्त्याच्या कडेला एका तरुणाला दोन जण लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत होते. तो तरुण मदतीसाठी याचना करत असताना कोणीही त्याच्या मदतीला घावले नाही. मात्र, पिंपरी चिंचवडमधील एका महिलेने धाडक करुन त्या तरुणाची सुटका केली व रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सातारा रोडवर कोंढापुर ते बांडेवाडी दरम्यान नुकतीच घडली.

अनिता अगरवाल असे त्या महिलेचे नाव असून त्या ‘हमारा विश्व फाउंडेशन’च्या अध्यक्षा आहेत. अनिता या दशक्रिया कार्यक्रमानंतर मंगदरी, वेल्हेहून परतत असताना पुण्याजवळील खेड शिवापूर, कुंडनपुर फाटा येथे त्या थांबल्या. त्या ठिकाणी एका तरुणाला दोन जण लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण करत होते. तो तरुण रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी याचना करत होता, परंतु तेथून जाणारे लोक थांबत नव्हते. अनिता यांनी धाडसाने त्या मारेकऱ्यांना आव्हान दिले आणि तरुणाच्या मदतीसाठी धावून गेल्या. मारेकऱ्यांनी त्यांना शिवीगाळ केली, परंतु अनिता अगरवाल यांच्या धाडसाने घाबरलेल्या मारेकऱ्यांनी अखेर पळ काढला. त्यानंतर त्यांनी लोकांना मदतीसाठी बोलावून तरुणाला रुग्णवाहिकेतून श्लोक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तरुणाचा जीव थोडक्यात वाचला, आणि अनिता अगरवाल यांनी स्थानिकांना धैर्य दाखवण्याचे आवाहन केले. “मी एक महिला असून धाडस करू शकते, तर तुम्ही का भिता? उद्या तुमचा मुलगा, भाऊ, मित्र अशा स्थितीत असू शकतो,” असे बोलून त्यांनी लोकांना सजग होण्यास सांगितले.

महिलेच्या धाडसामुळे वाचला तरुणाचा जीव