
पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) - हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) आता जुन्या वाहनांनाही बसवावी लागणार असून, यासाठी ३० एप्रिलची मुदत वाढ देण्यात आली आहे. सध्या नव्या वाहनांना ती उपलब्ध होते. मात्र, जुन्या वाहनधारकांनी अशा प्रकारची नंबर प्लेट लवकर बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. या नंबर प्लेटसाठी देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते.
नव्याने वाहन खरेदी केल्यानंतर या नंबर प्लेट उपलब्ध होतात. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार केल्या आहेत. या प्लेटवर होलोग्राम स्टिकर, इंजिन, चेसिस क्रमांक प्रेसिंगद्वारे तयार केलेले असते. त्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यात वाढ करून ती ३० एप्रिल करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सींची नेमणूक केली आहे.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा फायदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. कोणीही कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. गैरवापर होत नाही. अपघात झाला, तर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या मालकासह सर्व संबंधित माहिती देते. एप्रिल २०१९ नंतर बाजारात येणाऱ्या सर्व वाहनांना ती अनिवार्य आहे, तसेच आता २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच हा निर्णय झाला.