कामशेत येथील व्यवसायिकाचा डंपर चोरी करणारे आणि विकत घेणाऱ्या आरोपीस अटक; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मावळ, दि.३० (लोकमराठी) – मावळ तालुक्यातील कामशेत येथील व्यवसायिकाचा डंपर चोरी करणारे तीन आरोपी आणि विकत घेणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

डंपर चोरणारे विष्णू भगवान जाधव (रा. गोळेवाडी तळेगाव दाभाडे), ड्रायवर अमोल चौगुले , कृष्णा सीताराम देवकर (वय २५ रा. मुलुंड जि. ठाणे) आणि विकत घेणारा रवी अंकुश लष्कर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; कामशेत पोलीस स्टेशन गु.र.नं २५६/२०२२ भादवि कलम ३७९ नुसार दाखल झाला होता. विजय विठ्ठल गायकवाड वय ४८ रा.कांब्रे ता.मावळ जि. पुणे यांनी फिर्याद दिली की; दि.२९/१२/२०२२ रोजी रात्री माझा पुतण्या रोशन गायकवाड याचे मालकीचा डंपर क्र.MH 46 F 4857 हा टायर पंक्चर झाल्यामुळे पुणे मुंबई हायवे लगत कामशेत येथील HP पेट्रोल पंपावर डंपर वरील ड्रायवर अमोल चौगुले हा लावून गेला होता. तरी दि.३०/१२/२०२२ रोजी सकाळी पंपावर पाहिले असता डंपर मिळून आला नाही. गुन्ह्यात चोरीस गेलेल्या डंपर चा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू होता. CCTV फुटेज च्या आधारावर हा डंपर मुंबई बाजूकडे चोरून नेल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाला समजले. खबऱ्यांमार्फत तसेच तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे डंपरवर चालक असणारा इसम अमोल चौगुले याचा चोरीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. अमोल चौगुले यास गुन्हे शाखेच्या पथकाने कामशेत येथून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्या बाबत विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार यांच्या मदतीने डंपर चोरून तो ठाणे येथे राहणारा रवी अंकुश लष्कर या इसमाला विकल्याची कबुली दिली.गुन्ह्यातील आरोपींची नावे निष्पन्न झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने ठाणे येथे जाऊन डंपर चोरणारे दोन आरोपी विष्णू भगवान जाधव, कृष्णा सीताराम देवकर आणि विकत घेणारा रवी अंकुश लष्कर यास ताब्यात घेतले असून त्यांनी देखील सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.उर्वरित दोन आरोपी आकाश अशोक पवार (रा. वाघोली पुणे), अशोक सुरेश देवकर , (रा.सेलूबजार ता. मंगळूरपीर जि. वाशीम) यांचा शोध पोलीस घेत आहेत.

आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी कामशेत पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. कामशेत पोलिस तपास करीत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.स.ई. प्रदीप चौधरी, सहा.फौजदार.प्रकाश वाघमारे, पो.हवा.राजू मोमीन, पो. कॉ. अक्षय नवले यांनी केली आहे.