विद्यापीठ आदिवासी नायकांचे चरित्र पुढे आणणार : प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रविवारी ‘मुकाबला’, ‘क्रांतिवीर बिरसा मुंडा’ या ग्रंथांचे प्रकाशन प्र. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून डॉ. शितल चौरे, डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. विजय खरे, सुधीर लंके, सोनवणे, प्रा. शिवाजी दिघे, प्रा. अनिल पवळ, डॉ. प्रभाकर देसाई.

पुणे (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यात जे आदिवासी नायक स्वातंत्र्यासाठी लढले त्यांची माहिती विद्यापीठ संकलित करत असून, ती ग्रंथरुपाने समाजासमोर आणली जाणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी केले.

विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात अकोले येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयातील निवृत्त क्रीडा संचालक प्रा. शिवाजीराव दिघे यांनी लिहिलेले ‘मुकाबला’ हे आत्मकथन व विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे यांनी लिहिलेल्या ‘क्रांतिवीर बिरसा मुंडा’ या चरित्राचे प्रकाशन करताना ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखा विभागाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे, पत्रकार सुधीर लंके, मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई, गोंदण क्रिएशनचे प्रा. अनिल पवळ, शालिनी दिघे, समय प्रकाशनचे शिवाजी शिंदे हे उपस्थिती होते.

डॉ. तुकाराम रोंगटे यांनी लिहिलेल्या चरित्रातून बिरसा मुंडा यांचे कार्य सोप्या भाषेत समाजापर्यंत पोहोचणार आहे. तसेच दिघे यांचे आत्मकथन हे क्रीडा शिक्षकांसाठी दिशादर्शक असल्याचे ते म्हणाले. खरे म्हणाले, प्रा. दिघे व प्रा. रोंगटे यांचे नाते गुरू शिष्याचे आहे. या दोघांचे ग्रंथ एकाच वेळी प्रकाशित होत आहे हा दुर्मिळ योग आहे. लंके यांनी दोन्ही ग्रंथांवर तपशीलवार भाष्य केले. ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात काय आव्हाने आहेत ते ‘मुकाबला’ हा ग्रंथ सांगतो. तसेच प्रा. रोंगटे यांनी विज्ञानवादी  बिरसा मुंडा वाचकांसमोर मांडले आहेत, असे ते म्हणाले. न्यूझीलंड येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेले प्रा. सुभाष देशमुख ( श्रीरामपूर) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. शितल चौरे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार  गोंदणचे प्रकाशनचे प्रकाशक अनिल पवळ यांनी मानले.